पाकिस्तानच्या लीगला बांगलादेशचा झटका!

खेळाडू पाठवण्यास ठाम नकार

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Bangladesh's blow to Pakistan's league पाकिस्तानच्या टी-२० लीग स्पर्धेला मोठा धक्का बसला असून बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्या खेळाडूंना परत पाठवण्यास ठाम नकार दिला आहे. या निर्णयामुळे स्पर्धेतील काही संघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बांगलादेशने आपल्या तीन महत्त्वाच्या खेळाडूंची ना हरकत प्रमाणपत्रेही रद्द केली असून या घडामोडीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. नुकतीच बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेत बांगलादेशने तीनपैकी दोन सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. मालिकेनंतर बांगलादेशचे खेळाडू पुन्हा पाकिस्तानात जाऊन लीगमध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मंडळाने अचानक भूमिका बदलत त्यांना परत न पाठवण्याचा निर्णय घेतला.
 
 
 
Bangladesh
 
वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आणि नाहिद राणा यांची ना हरकत प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. रहमान हा लाहोरच्या संघाकडून, तर राणा पेशावरच्या संघाकडून खेळत होता. हे दोन्ही खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी मायदेशी परतले होते. आता मंडळाने स्पष्ट केल्याप्रमाणे ते पुन्हा पाकिस्तानात जाणार नाहीत.रहमानच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्याने मालिकेत पुनरागमन करत चांगली गोलंदाजी केली असली तरी पुढील स्पर्धांसाठी त्याची पूर्ण तंदुरुस्ती महत्त्वाची मानली जात आहे.
 
 
दरम्यान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात लवकरच टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका होणार आहे. या पार्श्वभूमीवर रहमान, राणा आणि तस्किन अहमद यांना विश्रांती देण्यात आली आहे. लीग स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असताना या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा संबंधित संघांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका २७ एप्रिलपासून सुरू होणार असून दुसरा सामना २९ एप्रिलला आणि तिसरा सामना २ मे रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी संघांची घोषणा देखील करण्यात आली असून, बांगलादेश आता आंतरराष्ट्रीय मालिकेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.