सीमेवर अचानक अंधार; पंजाब-काश्मीरमध्ये ब्लॅकआउट मॉक ड्रिल!

सुरक्षेची मोठी चाचणी!

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
चंदीगड/जम्मू,
blackout-mock-drill : पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लॅकआउट मॉक ड्रिल घेण्यात आली. या सरावादरम्यान संपूर्ण परिसरात अचानक अंधार पसरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 

BLACKOUT 
 
 
या मॉक ड्रिलनुसार रात्री 8 ते 8.15 या वेळेत घरं, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. सायरन वाजताच नागरिकांना सर्व दिवे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
 
या सरावामध्ये एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य विभाग, सिव्हिल डिफेन्स, एनसीसी आणि स्थानिक प्रशासन अशा विविध यंत्रणांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता तपासणे हा या ड्रिलचा मुख्य उद्देश होता.
 
प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. ड्रिलदरम्यान जनरेटर, टॉर्च किंवा इतर प्रकाशयंत्रांचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
 
दरम्यान, या सरावाचा उद्देश कोणत्याही आकस्मिक संकट, हवाई हल्ला किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिक आणि यंत्रणा किती सज्ज आहेत, याची चाचणी घेणे हा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ड्रिल संपल्यानंतर पुन्हा सायरन वाजवून ‘ऑल क्लिअर’चा संकेत देण्यात आला आणि परिस्थिती पूर्ववत करण्यात आली.