जनगणनेसाठी अमरावती जिल्हा सज्ज

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
५,५२० कर्मचार्‍यांची नियुक्ती
‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध
 
अमरावती, 
Census: Amravati भारताची लोकसंख्या गणना २०२७ मध्ये घेण्याचा निर्णय जाहीर झाला असून यावेळची जनगणना ही स्वतंत्र भारताची आठवी आणि २१ व्या शतकातील तिसरी जनगणना असणार आहे. विशेष म्हणजे, ही भारताची पहिली ‘डिजिटल जनगणना’ असेल. या ऐतिहासिक प्रक्रियेत नागरिकांना प्रत्यक्ष सहभाग नोंदवता यावा यासाठी ‘स्व-गणना’ ही सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली असून, अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जि. प. सीईओ सत्यम गांधी उपस्थित होते.
 
 
amt
 
ही जनगणना दोन स्वतंत्र टप्प्यात पार पडणार असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना, तर दुसर्‍या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाईल. स्व-गणनेसाठी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी शासनाच्या हीींिीं://ीश.लशर्पीीी.र्सेीं.ळप अधिकृत वेबपार्टलवर आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून कुटुंबाची माहिती भरायची आहे. यासाठी आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरच्या आधारे लॉगिन करून एकूण ३३ प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय असून नागरिकांनी कोणताही क्यूआर कोड स्कॅन करू नये किंवा बँक खाते, पॅन कार्डचा तपशील कोणालाही देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
Census: Amravati  अमरावती जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकूण ४,४९९ घरयादी गट बनविण्यात आले आहेत. या कार्यासाठी ६८ क्षेत्र प्रशिक्षक, ४,६३९ प्रगणक आणि ८१३ पर्यवेक्षक अशा एकूण ५ हजार ५२० कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. जे नागरिक तंत्रज्ञान वापरू शकत नाहीत किंवा ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, त्यांच्यासाठी प्रशिक्षित प्रगणक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रत्येक घरी भेट देऊन अ‍ॅपद्वारे माहितीची नोंद करतील. याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास स्थानिक तहसील कार्यालय किंवा नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.