वॉशिंग्टन,
Dattatreya Hosabale's statement संघ ही कोणत्याही प्रकारची वर्चस्व गाजवणारी संघटना नसून राष्ट्रभक्ती आणि हिंदू संस्कृतीच्या मूल्यांवर आधारलेली संस्था असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले. एका मुलाखतीत संघाच्या भूमिकेबाबत सविस्तर बोलत असताना ते म्हणले, हिंदू समाजाने इतिहासात कधीही इतरांवर आक्रमण केले नाही किंवा कोणाला गुलाम बनवले नाही, त्यामुळे हिंदूंनी कोणाकडून माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य अधोरेखित केले. ही संस्कृती सर्वसमावेशक असून जगाला ‘सर्व जग एक कुटुंब आहे’ हा संदेश देणारी आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच परंपरा आणि आधुनिकता या एकमेकांच्या विरोधात नसून त्या एकत्रितपणे पुढे जाऊ शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबाबत बोलताना होसबळे यांनी सांगितले की, त्यांचे व्यक्तिमत्त्व संघाच्या संस्कारांतून घडले आहे. संघाशी दीर्घकाळ जोडलेले राहून त्यांनी मिळवलेले अनुभव आणि मूल्ये आज त्यांच्या नेतृत्वात दिसून येतात, याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्यांनी नमूद केले.
देशाच्या नावाबाबत त्यांनी ‘भारत’ या शब्दाचा आग्रह धरत, देशाला त्याच नावाने संबोधण्याची गरज व्यक्त केली. सामाजिक ऐक्याच्या संदर्भात त्यांनी मुस्लिम समाजाला पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आणि आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधना अंगीकारण्याचे आवाहन केले.परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी ज्या देशात ते स्थायिक आहेत त्या देशाशी निष्ठा राखावी, पण आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते कायम ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. संघाच्या शताब्दी वर्षाबद्दल बोलताना त्यांनी हे वर्ष केवळ उत्सवाचे नसून आत्मपरीक्षणाचे असल्याचे स्पष्ट केले आणि अजूनही अनेक उद्दिष्टे साध्य करायची बाकी असल्याचे नमूद केले. या माध्यमातून त्यांनी जागतिक पातळीवर संघाची भूमिका स्पष्ट करत हिंदू संस्कृतीचा व्यापक आणि मानवतावादी दृष्टिकोन मांडला.