एसडीओ दुचाकीने पोहोचले नदीवर
पोकलँडसह तीन वाहने जप्त
अमरावती,
Dharani: Sand smuggling धारणीजवळच्या सोनाबर्डी येथील तापी नदीच्या रेती घाटावर सुरू असलेल्या अवैध उत्खननावर महसूल प्रशासनाने अक्षरशः ‘मध्यरात्री सर्जिकल स्ट्राईक’ करत तस्करांचे जाळे उधळून लावले. उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी कोणताही गाजावाजा न करता दुचाकीवरून थेट घाट गाठत छापा टाकला आणि पोकलँड मशीनसह तीन वाहने जप्त केली. या धाडसी कारवाईमुळे रेती माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
Dharani: Sand smuggling गेल्या काही दिवसांपासून सोनाबर्डी घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. मात्र, या कारवाईची कुणालाही चाहूल लागू न देता शुक्ला यांनी अत्यंत गुप्तपणे योजना आखली. गुरुवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजता दोन कर्मचार्यांसह दुचाकीवरून त्यांनी थेट घाटावर एंट्री घेतली आणि सुरू असलेला अवैध उपसा रंगेहात पकडला. अधिकार्यांची उपस्थिती पाहताच मजूर आणि यंत्र चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. काहींनी अंधाराचा फायदा घेत नदीकाठ सोडला, तर काहींनी वाहनांसह पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकार्यांनी चपळाईने पाठलाग करत एक टिप्पर आणि कॅम्पर वाहन ताब्यात घेतले. याशिवाय, जवळील शेतात लपवून ठेवलेले पोकलँड मशीनही शोधून काढत जप्त करण्यात आले. या कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, परवानगीपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित घाटमालकांवर कठोर कारवाईसह घाट बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईत नायब तहसीलदार राजेश माळी, गजानन कुंबरे, मंडळ अधिकारी अनिल उमाळे, रोकडे, राहुल घोगरे, लिपिक नितीन गिरनाळे तसेच स्थानिक पोलिसांचा सहभाग होता. या धडक कारवाईनंतर परिसरातील अवैध वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तस्करांना सूट नाहीच
तालुक्यात कुठेही अवैध रेती उत्खनन किंवा तस्करी आढळल्यास तत्काळ कठोर कारवाई केली जाईल. नियम मोडणार्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. अशा धडक कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहतील, असा ठाम इशारा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी दिला आहे.