पाश्चात्य विचारांचा लेप सर्वांनाच उतरवावा लागेल

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आग्रही प्रतिपादन
शक्तिस्थळाचा शिलान्यास

नागपूर, 
दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपल्या मन-बुद्धीवर पाश्चिमात्य विचारांचा लेप चढला आहे. त्याला उतरवावा लागले आणि दैनंदिन कृतीपासून ते राष्ट्रीय मु्द्यांपर्यंत आपल्या सगळ्यांना भारतमय व्हावे लागेल, असे आग्रही प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. डॉ. थत्ते सेवा व संशोधन संस्थेद्वारा प्रस्तावित भारत-दुर्गा शक्तिस्थळाचा जामठामधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात शुक्रवार २४ एप्रिल रोजी शिलान्यास सोहळा पार पडला. श्री जुना आखाडा पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानंद महाराज, बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतुंभरा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितीन गडकरी, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. माया इवनाते, महापौर नीता ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
mohanji
 
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, मंदिर पूर्ण झाल्यानंतर तेथे नित्य पूजा-अर्चना होईल. भारत-दुर्गेची पूजा केवळ पुजार्‍यांनाच नाही तर सर्वांनाच करावी लागेल. पण, याची वेगळी आहे. भारतमातेची पूजा करायची असेल तर प्रत्येकाला भारत बनावे लागेल, भारताला जाणून घेत देशाला मानावे लागेल. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपल्या मन-बुद्धीवर पाश्चिमात्य विचारांचा लेप चढला आहे. त्याला उतरवावा लागले आणि दैनंदिन कृतीपासून ते राष्ट्रीय मुद्यांपर्यंत आपल्या सगळ्यांना भारतमय व्हावे लागेल. काम कठीण वाटेल. पण, लहान-लहान गोष्टींतून हे काम करणे आवश्यक आहे. काम सुरू केले तर उद्दीष्टापर्यंतदेखील नक्कीच पोहोचू.
 
 
 
शक्तीशिवाय काहीच होत नाही. सत्यालादेखील शक्तीचा आधार घेत जगात प्रचलित करावे लागते. आपल्या देशात सत्यासाठी शक्तीची आवश्यकता नसते. दुसर्‍या देशात मात्र ‘जिसकी लाठी उसकी भैस’ अशा पद्धतीने वागतात. आज जगाची अवस्था सगळेच पाहत आहेत. अशा स्थितीत आपला देश विश्वगुरू की नाही अशा संभ्रमात लोक असतात. राम मंदिराबाबतदेखील असाच अनेकांच्या मनात संभ्रम होता. मात्र, मनात विश्वास होता व ते साकार झाले. जगाने भारताचा मार्ग स्वीकारला नाही तर त्यांचे काय भविष्य असेल हा मोठा सवाल आहे. जे अनिवार्य आहे त्याबाबत मनात किंतूपरंतु बाळगण्याची गरज नाही. भारत-दुर्गेची प्रत्येक भारतीयाने पूजा केली निश्चितच भारताचे पुनर्वैभव परत येईल व भारत शक्तीसंपन्न होईल, असे ते म्हणाले.
 
 
मूळ संकल्पना मोरोपंत पिंगळेंची
कार्यक्रमादरम्यान सर्वच मान्यवरांनी भारत-दुर्गामातेची संकल्पना मांडण्याचे श्रेय Dr. Mohanji Bhagwat  डॉ. मोहनजी भागवत यांना दिले. मात्र, त्यांनी हा विचार मोरोपंत पिंगळे यांचा होता, असे स्पष्ट केले. एकात्मता यात्रेच्या वेळी चार दिशांना भारतमातेच्या मूर्ती गेल्या होत्या. त्यातील मूर्ती नागपुरात आली होती. मात्र, रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाले. आता त्यांची संकल्पना साकार होत आहे, असे ते म्हणाले.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत-दुर्गा मातेच्या मंदिरातून देशाला प्रेरणा मिळेल. १८ भुजा असलेली भारत-दुर्गा ही शक्तीची मूर्ती असून संपूर्ण देशात नवचेतना जागृत होईल. या मंदिरातून देशभराला प्रेरणा यातून भक्ती व शक्तीची साधना होईल.
नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारत-दुर्गा शक्तीस्थळामागे भारत निर्माणाची प्रेरणा आहे. त्यातून भारताचे पुनर्निर्माण व्हावे हाच विचार सरसंघचालकांच्या मनात आला व त्यातूनच हे निर्माण कार्य सुरू झाले आहे. भारत-दुर्गा शक्तीस्थळ संपूर्ण देशाला प्रेरणा देईल.
 
 
स्वामी अवधेशानंद गिरी
भारत-दुर्गा मातेचे मंदिर वे शक्तिपीठ ठरेल. भारत केवळ भूमी नाही, जगदंबेचे स्वरूप आहे. संघाचे कार्य ईश्वरीय कार्य आहे. तेथे येणारे विचार ईश्वरीयच असतात. आपल्या मुलांपैकी किमान एका मुलाला स्वयंसेवक बनवा. या मंदिराच्या माध्यमातून अखंड भारताकडे देशाचे मार्गक्रमण होत असल्याचे संकेत मिळत आहेत व भारताच्या हरविलेल्या सीमा परत प्राप्त होतील, असे मला वाटत जगात वर्तमान काळात एकाच प्रकारच्या लोकांमध्ये संघर्ष सुरू आहे. तो आपला विचार नाही. पाश्चिमात्य जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. या सगळ्यांना भारतच दिशा दाखवेल. भारतावर आक्रमण करणारे अनेक संस्कृती लयाला गेल्या. फ्रेंच, जर्मनी ब्रिटीशर्सचे युग संपले असून येणारा काळ भारताचाच असेल व भारतच जगाचे नेतृत्व करेल. संपूर्ण जग भारताचे अनुसरण योग, आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण एका अर्थाने विश्वगुरू झालोच आहे. भारतात ५१ शक्तिपीठे असून हे मंदिर ५२ वे शक्तिपीठ ठरेल, असा विश्वास जुना आखाडा पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी व्यक्त केला.
 
 
साध्वी ऋतंभरा
सर्वांना शक्तीची आठवण करून देण्याची आवश्यकता
शक्ती सर्वांमध्ये असते, फक्त तिची आठवण करून देण्याची गरज शक्ती नेमकी कुठे गेली याचा विचार व्हायला हवा. हिंदूंची शक्ती भाषा, पक्ष राजकारण, प्रांतीय विभाजित झाली आहे. एकत्रित आले तर आपण जगाला झुकवू शकतो. सर्वांनी संघटीत रहायला हवे, असे साध्वी ऋतुंभरा म्हणाल्या.
 
 
धीरेंद्र कृष्ण शास्त्री
भारत मातृप्रधान देश आहे. जेव्हा भारत-दुर्गा मंदिर बनेल तेव्हा देश शक्तीसंपन्न होईल व अखंड बनेल. संपूर्ण जगात फक्त भारतातच मातेचा जयजयकार होतो. जगात महिलांना भोग्य मानले जाते, मात्र भारतात पूज्य. भारताचा गौरव पुन:स्थापित करण्याच्या प्रयत्नातीलच हे पाऊल आहे. भारत देवशक्ती व पूजेकडे परत जात आहे. हे मंदिर पाहून जगातील लोकांना कळेल की भारत शास्त्र व शस्त्रांच्या आधारे चालतो, असे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण म्हणाले.
 
 
स्वामी गोविंददेव गिरी महाराज
जगाचे मांगल्य साध्य करायचे असेल तर भारताचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. त्यासाठी शक्ती आवश्यक आहे. रामराज्याची स्थापना होत नाही तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण होणार नाही. ज्ञानेश्वरांचे पसायदान हेच रामराज्याचे वर्णन आहे. नाशिकमधील कॉर्पोरेट कांडानंतर संताप येत नसेल तर आपण मृतप्राय झालो आहोत की जिवंत याचा विचार करायला हवा. अशा लोकांविरोधात उग्र होऊन उभे रहावे लागेल. आपल्या संस्कृतीनुसार शक्तीमान होणे आवश्यक आहे, असे गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.