दादालोरा ‘एक खिडकी’ योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षणाचा यशस्वी परिणाम
गोंदिया,
‘Ek khidki yojana' आदिवासी व दुर्गम भागातील युवक-युवतींना पोलिस भरतीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला यश आले असून, गोठणगाव येथील संध्या ईश्वार हिची लातूर जिल्हा पोलिस दलात, तर बोडदे-करडगाव येथील आरमान राणे याची कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात निवड झाली आहे. संध्या व आरमान हे मागील वर्षभरापासून एओपी गोठणगाव येथे पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होते. दरम्यान त्यांच्या निवडीवर एओपीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
‘Ek khidki yojana' गोंदिया जिल्हा पोलिसांच्या ‘दादालोरा एक खिडकी’ योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून, पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील व केशोरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. प्रशिक्षणादरम्यान लेखी परीक्षेसाठी पोलीस उपनिरीक्षक गित्ते व पोलिस शिपाई डुमरे यांनी अंतरवर्ग प्रशिक्षण व सराव पेपर घेतले. तसेच मैदानी चाचणीसाठी हवालदार इंगळे, पोलिस शिपाई मेश्राम व अंकुश कावळे यांनी बाह्य प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांची शारीरिक तयारी घडवून आणली. या प्रशिक्षणासाठी नक्षल प्रोपागंडा सेलचे अमलदार भास्कर हरीणखेडे यांचेही नियमित सहकार्य लाभले. दरम्यान, निवड झालेल्या संध्या ईश्वार व आरमान राणे यांचा २४ एप्रिल रोजी एओपी येथे पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी एओपी प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते, डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे, पोलिस पाटील सांगोळे तसेच एओपीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलिस हवालदार भावते व मिसार यांनी विशेष सहकार्य केले.