बोथा येथे खळबळ
उमरखेड,
Elderly murder पैशांची देवाण-घेवाण आणि ट्रॅक्टरच्या अवजारांच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बोथा (सा) येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. दौलत रामा गव्हाणे (वय ७५) हे गावात एकटेच राहत होते. आरोपी परमेश्वर साहेबराव मोरे (वय ३०) याने गव्हाणे यांच्याकडून ट्रॅक्टरची अवजारे तसेच वेळोवेळी काही रक्कम घेतली होती. ही अवजारे व पैसे परत करण्यावरून दोघांमध्ये गेल्या काही वाद सुरू होता.
Elderly murder गुरुवार, २३ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता गव्हाणे यांचे नातू रजनीश कैलास गव्हाणे यांना त्यांच्या घराबाबत संशयास्पद माहिती मिळाली. त्यांनी नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली असता घराला बाहेरून कडी लावलेली दिसून आली. यानंतर तत्काळ पोफाळी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने घर उघडण्यात आले. तपासणी केली असता दौलत गव्हाणे खाटेवर मृतावस्थेत आढळले. पुढील तपासात घराच्या आतील भागात लपून बसलेले परमेश्वर मोरे व विनोद कोंडबा गव्हाणे (वय २५) हे दोघे आढळून आले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तक्रारीनुसार, पैसे आणि अवजारे परत करण्यासाठी गव्हाणे यांनी तगादा लावल्याच्या रागातून आरोपींनी संगनमत करून रात्री ९ ते १०.३० दरम्यान त्यांचा तोंड व गळा दाबून खून केला. या प्रकरणी पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.