विकासकामांसाठी ११७ कोटी मंजूर
अमरावती,
'Hanuman Garhi' येथील प्रसिद्ध हनुमान गढी परिसरीतील धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी शासनाने तब्बल ११७ कोटी २५ लाख ४९ हजार ८६४ रुपयांच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
राज्यात पर्यटन विकासातून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुरुवातीला जिल्हाधिकारी अमरावती यांनी २५८.८८ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर उच्चस्तरीय समितीच्या चर्चेनंतर सुधारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. शासनाने दिलेल्या माहितीनुसार या कामांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे. संपूर्ण प्रकल्प तीन वर्षांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. हनुमान गढीचा विकास हनुमान चालीसा ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर होणार असून, जिल्हाधिकार्यांनी ट्रस्टकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे आवश्यक राहील. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारीही हनुमान चालीसा ट्रस्टवरच राहणार आहे. सर्व सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या ठेवण्याची अटही शासनाने घातली आहे. प्रकल्पात प्रस्तावित भक्त निवास व संत निवास या बाबी वगळण्यात आल्या असून, श्रीराम मंदिर यज्ञ मंडप प्रतिकृतीचा खर्च हनुमान चालीसा ट्रस्टने करायचा आहे. लेझर शोचे डिझाइन नामांकित वास्तुविशारदांकडून तयार करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
काय असणार या प्रकल्पात
'Hanuman Garhi' या प्रकल्पांतर्गत अॅम्फी थिएटर (खुले सभागृह), यज्ञशाळा, फूड मॉल, स्मृतिचिन्ह व हस्तकला केंद्र, कुस्ती आखाडा, महाप्रसाद सभागृह, बहुउद्देशीय सभागृह, मल्टिमीडिया शो केंद्र, प्रशासकीय इमारत, हनुमान गॅलरी (प्रदर्शन केंद्र) अशा विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत. याशिवाय सोलर हार्वेस्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, दिव्यांगांसाठी रॅम्प, पार्किंग, अंतर्गत रस्ते, मुख्य प्रवेशद्वार, सीसीटीव्ही, लेझर शो, हनुमान मूर्तीवरील आकर्षक प्रकाशयोजना, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, वॉटर बॉडी आणि परिसर सौंदर्यीकरणाची कामेही केली जाणार आहेत.