इराणचा अल्टिमेटम...तर शस्त्रसंधी तोडणार!

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
तेहरान,
Iran's ultimatum इराण आणि अमेरिकेमधील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला असून तेहरानकडून वॉशिंग्टनला थेट इशारा देण्यात आला आहे. इराणने अमेरिकेला ४८ तासांची मुदत देत स्पष्ट केले आहे की, त्यांच्या देशाची गोठवलेली मालमत्ता तातडीने मुक्त करण्यात आली नाही तर सध्या अस्तित्वात असलेली शस्त्रसंधी मोडीत काढली जाईल. या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अधिकच अस्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी निवेदनात सांगितले की, अमेरिकेने इराणच्या आर्थिक संसाधनांवर घातलेली निर्बंधात्मक कारवाई आणि मोठ्या प्रमाणावर रोखून ठेवलेली मालमत्ता हा वादाचा मुख्य मुद्दा आहे. त्यांनी इशारा दिला की, जोपर्यंत ही मालमत्ता मुक्त केली जात नाही, तोपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीवरील निर्बंध कायम राहतील. पुढील दोन दिवसांत अमेरिकेकडून ठोस प्रस्ताव न आल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
iran
 
दरम्यान, अमेरिके अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीवरील परिस्थितीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण आहे. त्यांनी असा दावा केला की, योग्य वेळीच सामुद्रधुनी उघडली जाईल आणि तो निर्णय पूर्णपणे अमेरिकेच्या हिताचा विचार करूनच घेतला जाईल. तसेच, त्यांनी इराणवर दबाव कायम ठेवण्याची भूमिका स्पष्ट करत लष्करी पर्याय खुले असल्याचेही सूचित केले. या सर्व घडामोडींमुळे इराण-अमेरिका संबंध पुन्हा ताणले गेले असून संभाव्य संघर्षाची भीती वाढली आहे. शांतता चर्चेची पुढील फेरी कधी होणार याबाबत अनिश्चितता कायम असून, पुढील काही दिवस या संपूर्ण प्रकरणासाठी निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.