तेहरान,
Israel-Lebanon ceasefire extended पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात तात्पुरता दिलासा देत शस्त्रसंधीचा कालावधी आणखी तीन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. राजनैतिक पातळीवर झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील काळात दोन्ही देशांच्या नेतृत्वाला चर्चेसाठी बोलावण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. याचवेळी इराणबाबत अमेरिकेची भूमिका अधिक कठोर असल्याचे संकेत मिळत आहेत. कोणताही करार अमेरिकेच्या हिताचा असेल तेव्हाच पुढे जाईल, असे स्पष्ट करत घाईघाईने निर्णय घेणार नसल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. त्यांनी अण्वस्त्रांच्या वापराची शक्यता नाकारली असली, तरी पारंपरिक लष्करी कारवायांमुळे इराणला मोठा फटका बसल्याचा दावा केला.
परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता
दरम्यान, परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या अनेक घडामोडी गेल्या काही तासांत घडल्या आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरूंग टाकणाऱ्या नौकांवर कारवाईचे आदेश देण्यात आले असून, भारताने आपल्या नागरिकांना इराणमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. इराणने या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, तर काही व्यापारी जहाजांवर ताबा मिळवण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर इराणने आपली गोठवलेली प्रचंड आर्थिक मालमत्ता मुक्त करण्याची अट घालत, ती पूर्ण न झाल्यास शस्त्रसंधी मोडण्याचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या निधीवर विविध देशांमध्ये मर्यादा आहेत. या कारणामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.