तेहरान,
Khamenei's health is critical इराणच्या सत्ताकेंद्रात मोठ्या घडामोडी सुरू असताना नव्या सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची प्रकृती हा चर्चेचा विषय ठरला आहे. युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या जखमांमुळे ते अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत, तसेच त्यांचा आवाजही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यांच्या सर्व सूचना आणि संदेश लेखी स्वरूपातच दिले जात असल्याची माहिती समोर येत आहे. वृत्तांनुसार, त्यांच्या पायावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्याने कृत्रिम पायाची गरज भासू शकते, अशी माहिती पुढे आली आहे. तसेच एका हातावरही शस्त्रक्रिया झाली असून त्यातून ते हळूहळू सावरत आहेत. चेहऱ्यावर आणि ओठांवर भाजल्याच्या जखमा असल्याने त्यांना बोलण्यात अडचणी येत असून पुढील काळात शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा ठावठिकाणा पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी किंवा सरकारी पदाधिकारीदेखील त्यांना थेट भेटत नसल्याचे सांगितले जाते. शत्रूराष्ट्रांकडून त्यांचे स्थान शोधले जाऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. तरीही देशाचे राष्ट्रपती आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या उपचार प्रक्रियेत सहभागी असल्याचे समजते. दरम्यान, सार्वजनिकरित्या कमकुवत प्रतिमा दिसू नये म्हणून ते अद्याप कॅमेऱ्यासमोर आलेले नाहीत. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी लिखित संदेशांचा वापर केला जात असून ते विश्वासू माध्यमांद्वारे पोहोचवले जात असल्याची माहिती समोर येत आहे.