ग्रामविकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे : भेंडारकर

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
- सडक अर्जुनीत सरपंच मेळावा उत्साहात

गोंदिया, 
गावाच्या विकासासाठी केवळ शासनाच्या योजना पुरेशा नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, पारदर्शकता आणि जबाबदारी ही तितकीच गरजेची आहे. प्रत्येक सरपंचाने आपल्या गावातील गरजांची अचूक ओळख करून प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि उपलब्ध निधीचा योग्य व प्रभावी वापर करावा, तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांवर विशेष लक्ष केंद्रित करून गावांचा शाश्वत विकास साधता येईल, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष Layakram Bhendarkar लायकराम भेंडारकर यांनी केले.
 
 
laikram
 
Layakram Bhendarkar पंचायत विभाग, जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने येथील आशीर्वाद लॉन येथे गुरुवारी २३ एप्रिल रोजी आयोजित पंचायत परिषद सरपंच मेळाव्यात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. जिल्ह्यातील सर्व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी गावागावातील सरपंचांना एकत्र आणणे, त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा घडवून आणणे हे या मेळाव्याचे उदिष्ट्य होते. प्रसंगी भेंडारकर यांनी ग्रामविकासासाठी नियोजनबद्ध आणि लोकसहभागावर आधारित काम करण्याचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामसभेचे बळकटीकरण, स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि शासनाच्या योजनांची पारदर्शक अंमलबजावणी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सरपंचांना शासनाच्या विविध योजना, त्यांची प्रभावी अंमलबजावणी, उपलब्ध निधीचा योग्य वापर तसेच लोकसहभाग वाढवण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावपातळीवर पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकांच्या विश्वासावर आधारित प्रशासन उभारण्यावरही विशेष भर देण्यात आला. या मेळाव्यामुळे सरपंचांना एकमेकांकडून शिकण्याची संधी मिळाली असून आपल्या गावाच्या विकासासाठी नव्या कल्पना आत्मसात करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, माजी सरपंच सुधीर गोतमारे (खुर्शिपार), जि.प.सभापती लक्ष्मण भगत, आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.