अमरावती,
Maharashtra Medical Council election 2026, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) ९ सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून, अमरावती जिल्ह्यात येत्या २६ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार ५६५ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक मतदारांसाठी प्रशासनाकडून ४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
अवर सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई यांनी जारी केलेल्या राजपत्रानुसार ही निवडणूक होत आहे. अमरावती जिल्ह्यातील मतदानासाठी श्रीकृष्ण पेठ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय परिसर) येथे व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये फिजीऑलॉजी प्रॅक्टिकल हॉल क्रमांक १ आणि २ मध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण ४ मतदान केंद्रे असतील. केंद्र क्रमांक १ मध्ये १ ते ६४४, केंद्र क्रमांक २ मध्ये ६४५ ते १२८२, केंद्र क्रमांक ३ मध्ये १२८३ ते १९२५ आणि केंद्र क्रमांक ४ मध्ये १९२६ ते २५६५ या अनुक्रमांकाचे मतदार आपले मतदान करू शकतील.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ५ मतदान पथके नियुक्त करण्यात आली असून, यामध्ये एकूण २५ कर्मचार्यांचा समावेश आहे. या कर्मचार्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले असून द्वितीय प्रशिक्षण २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. हे कर्मचारी २५ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता निवडणूक साहित्यासह केंद्रांकडे रवाना होतील. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. प्रत्येक मतदाराला एकूण ९ मते देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
मतदानासाठी ओळख पटविण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट किंवा निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली इतर छायाचित्रित ओळखपत्रेही ग्राह्य धरली जातील. विवाहित महिला मतदारांच्या नावामध्ये बदल असल्यास त्यांनी नाव बदलल्याचा पुरावा सोबत ठेवणे आवश्यक आहे. मतदारांना सुलभतेसाठी प्रशासनाने क्यूआर कोडची (टठ उेवश) सुविधा उपलब्ध करून दिली असून, तो स्कॅन करून मतदारांना मतदार यादीतील आपला अनुक्रमांक शोधता येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.