सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते भूमिपूजन
डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प
हेलीपॅड व एअर अॅम्बुलन्सची सुविधा
नागपूर,
National Healthcare Institute जागतिक दर्जाच्या व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले सुसज्ज ४६१ बेडची सुविधा असलेल्या नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट या मध्य भारतातील अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले.
उत्तर अंबाझरी मार्गावरील डॉ. आबाजी थत्ते सेवा अनुसंधान संस्थेच्या वतीने हा वैद्यकीय प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभास मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी, संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, सचिव शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर आदी उपस्थित होते.
प्रस्तावित इमारतीच्या कोणशिलेचे अनावरण
प्रारंभी नॅशनल हेल्थकेअर या संस्थेचे भूमिपूजन सर संघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रस्तावित इमारतीच्या प्रतिरूप तसेच कोणशिलेचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्याचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अँड. सुनील मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर व कोषाध्यक्ष आनंद औरंगाबाद यांनी केले. या कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील तसेच विशेष निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने होते.
अवयव प्रत्यार्पण व बर्न वॉर्ड
National Healthcare Institute नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट ही मध्य भारतातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक मल्टी स्पेशलिटी व सुपर स्पेशलिटी संस्था म्हणून सुरू होत असून २३ मजली सुसज्ज इमारत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये हेलिपॅडची सुविधा असून एअर अॅम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होणार आहे. अत्याधुनिक उपचारांच्या सुविधांसोबतच अवयव प्रत्यार्पण व वॉर्ड राहणार असून ४६१ बेडची सुविधा तसेच रुग्णांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर यांनी यावेळी सांगितले. सिंगापूरच्या एसके या जागतिक दर्जाच्या वास्तू विशारद संस्थेतर्फे हा प्रकल्प तयार करण्यात आला असून मेडिकल प्लॅनिंग आर्किटेकला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
लक्षात घेऊन प्रकल्पाची संकल्पना
नॅशनल हेल्थकेअर इन्स्टिट्यूट सुमारे पाच लाख चौरस फूट क्षेत्रावर उभारले जाणार असून नागपूर परिसर तसेच मध्य भारतातील रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पाची संकल्पना करण्यात आली आहे. मल्टीस्पेशालिटी तसेच सुपर स्पेशलिटी अंतर्गत जेरियाट्रिक रूमेट्रोलॉजी, हृदय व रक्तवाहिन्या, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, क्रीडा वैद्यक प्लास्टिक व पुनर्रचना सुविधा राहणार आहेत. या संस्थेमध्ये पदव्युत्तर व सुपर स्पेशलिटी अभ्यासक्रमासाठी पूर्ण सुसज्ज शैक्षणिक सुविधा असतील अशी माहिती संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर यांनी दिली.