पवन खेरा यांचा अंतरिम जामीन फेटाळला!

गुवाहाटी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
गुवाहाटी,
Pawan Khera's interim bail rejected गुवाहाटी उच्च न्यायालय यांनी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांचा अंतरिम जामीन अर्ज नाकारत त्यांना मोठा धक्का दिला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुईयान यांच्याबाबत केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पार पडली असून न्यायमूर्ती पार्थिव ज्योती सैकिया यांच्या खंडपीठासमोर दोन्ही बाजूंनी सविस्तर युक्तिवाद मांडण्यात आले. खेरा यांच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडताना, त्यांच्या अटकेची गरज नसल्याचे सांगितले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, खेरा देश सोडून जाण्याची शक्यता नाही आणि हा वाद राजकीय पार्श्वभूमीवर उभा राहिला आहे.
 
 
 
bail rejected
दुसरीकडे, आसाम सरकारकडून महाधिवक्ता देवजित लोन सैकिया यांनी या अर्जाला विरोध करत खेरा यांच्यावर गंभीर आरोप असल्याचे नमूद केले. त्यांच्या मते, हा केवळ मानहानीचा विषय नसून बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीचेही आरोप या प्रकरणात आहेत. त्यामुळे खेरा यांना कोणताही दिलासा देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, खेरा यांनी यापूर्वी रिंकी भुईयान यांच्याकडे अनेक पासपोर्ट आणि परदेशातील मालमत्तेबाबत आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर खेरा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील सुनावणी आणि निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.