राष्ट्रसेविका समितीचे आयोजन
अमरावती,
'Rashtra Sevika Samiti' राष्ट्रसेविका समिती, विदर्भ प्रांत व नरसम्मा महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ एप्रिल रोजी, नरसम्मा महाविद्यालयातील गार्गी विचार कक्षात एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नारी ते नारायणी: विकसित भारत २०४७’ ह्या विषयावरील परिसंवादात संपूर्ण विदर्भातून मान्यवर, प्राध्यापिका, गृहिणी सहभागी होतील. रविवार, २६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता परिसंवादाचे उद्घाटन होईल. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान नरसम्मा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर भोंदू भूषवतील. प्रमुख अतिथी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके उपस्थित राहतील. या प्रसंगी संस्कार भारतीचे अ. भा. महामंत्री आशुतोष अडोणी यांचे ‘वर्तमान काळातील भारताची सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक परिस्थिती’ या विषयावर उद्बोधन होणार आहे.
'Rashtra Sevika Samiti' दुसर्या सत्रात एकूण ३ विषयांवर समांतर पॅनल चर्चासत्रे होतील. त्यात कुटुंब ते राष्ट्रनिर्मिती, आधुनिक भारतातील महिला, आणि समता ते सशक्तीकरण या तीन विषयांचा समावेश आहे. तिसर्या सत्रात विकसित भारत २०४७ या विषयावर मुक्त संवाद होईल. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी नरसम्मा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट हे राहतील. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विश्वमांगल्य सभेच्या सभाचार्य नाथपीठाच्या रेणुकामाई यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रसेविका समितीच्या अ. भा. शारीरिक प्रमुख मनिषा संत यांचे, ‘विकसित भारत-२०४७’ या विषयावर उद्बोधन होईल.