रेल्वे विभागाची याचिकाकर्त्याला मागणी
वर्धा-नांदेड रेल्वेमार्गातील झाड रक्तचंदन नव्हे तर बिजासाल
अनिल कांबळे
नागपूर,
red sandalwood tree case शेतकऱ्याच्या शेतातून रेल्वेचा मार्ग जात असल्यामुळे शेतात रक्तचंदनाचे झाड असल्याचे सांगून रेल्वेकडून 50 लाख रुपये शेतकऱ्याने घेतले. मात्र, ते झाड रक्तचंदनाचे नसून केवळ 10 हजार रुपये किंमतीचे बिजासाल प्रजातीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता रेल्वेकडून घेतलेले 50 लाख रुपये परत करावे लागणार आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नाेंदवले. या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्यायमूर्ती राज वाकाेडे यांच्यासमक्ष सुनावणी साेमवारी (27 एप्रिल) राेजी सुनावणी हाेणार आहे.
red sandalwood tree case वर्धा-नांदेड रेल्वे मागार्साठी माैजा खर्शी येथील शेत सर्वे क्रमांक 15 मधील केशव तुकाराम शिंदे आणि इतर चार शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचे भूसंपादन केले गेले. या शेतातील झाडांचे मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली हाेती, ज्यात एका झाडाच्या प्रजातीबाबत विशेष उल्लेख हाेता. हे झाड रक्तचंदन आहे, असा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला हाेता. त्याआधारावर शेतकरी शिंदे यांनी उच्च न्यायालयात रक्तचंदनाच्या झाडाचा माेबदला मागितला हाेता. उच्च न्यायालयाने एक काेटी रुपये शेतकऱ्यांना मंजूर करीत 50 लाख रुपये शेतकèयाला काढण्याची मुभा दिली हाेती. त्यामुळे शेतकऱ्याने 50 लाख रुपये काढून खर्च केले. पुसद वनविभागाने या झाडाची अचूक किंमत काढण्यासाठी बेंगळुरू येथील ‘काष्टविज्ञान आणि औद्याेगिकी संस्थान’ या भारत सरकारच्या संस्थेकडे चाचणी अहवाल मागितला हाेता. संस्थेने 23 मे 2025 राेजी आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार, सदरचे झाड हे रक्तचंदन नसून ते बिजासाल या प्रजातीचे असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या वैज्ञानिक अहवालाच्या आधारे, पुसद वनविभागाच्या पवनसंरक्षकांनी 8 जून 2025 राेजी झाडाच्या मूल्यांकन अहवालास मंजुरी प्रदान केली आहे. रेल्वे विभागार्ते अॅड. नीरजा चाैबे यांनी बाजू मांडली.
डिपाॅझिट रक्कम परत द्या : रेल्वे विभाग
रक्तचंदन झाड असल्याचा दावा करीत झाडाचे मूल्यांकन एक काेटी रूपये काढण्यात आले हाेते. यापैकी रेल्वे विभागाने 50 लाख रूपये उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा केले हाेते. 50 लाख रूपये याचिकाकर्त्याला देण्यात आले. परंतु रेल्वे विभागाने आता ते झाड रक्तचंदन नसल्याचे सांगत ’बिजासाल’ असल्याचे म्हटले आहे. या ’बिजासाल’ झाडाची किंमत दहा हजार रूपये आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्याच्या शेतातील झाड रक्तचंदनाचे असल्याचे म्हटले हाेते. ‘इंस्टीट्युट ऑफ वूड सायन्सेस’ या संस्थेने या झाडाचे मूल्यांकन एक काेटी रूपये काढले हाेते. हैद्राबादच्या एका संस्थेने या झाडाची किंमत दहा हजार रूपये असल्याचे म्हटले आहे. दरम्यान याचिकाकर्त्याने 50 लाख रूपये घेतले असले तरी त्यांना ही रक्कम परत करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलाला सूचना केली आहे. दुसरीकडे रेल्वे विभागाने डिपाॅझिट 50 लाख रूपयेही परत मागितले आहे. याचिकाकर्ते शेतकरी केशव शिंदे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात आता पैसे परत करण्याचा वाद निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाबाबत संभ्रम
शेतकरी केशव शिंदे यांनी शेतातील झाड रक्तचंदन असल्याचे कधीच म्हटले नव्हते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनीच शिंदे यांच्या शेतातील झाड रक्तचंदनाचे असल्याचा लेखी अहवाल दिला हाेता. त्याच आधारावर शेतकऱ्याने रेल्वेला एक काेटी रुपये माेबदला मागितला. जर जिल्हाधिकाऱ्यांनी संभ्रम निर्माण करणारा अहवाल दिला नसता तर शेतकऱ्याने न्यायालयाची पायरी चढली नसती. त्यामुळे या प्रकरणात आता जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा हाेण्याची शक्यता आहे.