भाजपची विदर्भ विभागीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
नाना पाटील शेगाव -- : Saint Nagri Shegaon संत नगरी शेगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत विदर्भ विभागीय कार्यशाळा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदयाचा विचार हा भाजपाचा आत्मा असून, प्रत्येक कार्यकर्त्याने शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे,असा स्पष्ट संदेश दिला. येथील होटल विघ्नहर्ता ईन येथे आयोजित या कार्यशाळेचा उद्देश पक्ष संघटन अधिक बळकट करणे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शासनाच्या योजनांची सखोल माहिती देणे हा होता. कार्यशाळेच्या प्रारंभी नोंदणी व उद्घाटन सत्रानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘वंदे मातरम्’ व महाराष्ट्र गीताने वातावरण राष्ट्रभावनेने भारावून गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. यानंतर जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे सादरीकरण संयोजक राजेश पांडे यांनी केले. कार्यशाळेतील विविध सत्रांमध्ये संघटन कौशल्य, मतदार संपर्क, तसेच ‘SIR’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ,कामगार कल्याण मंत्री आकाश फुंडकर, खासदार अनूप धोत्रे, प्रविण पोटे, रामदास तडस, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, दिनेश सूर्यवंशी, आमदार रणधीर सावरकर, अर्चनाताई डेहनकर यांच्यासह विदर्भातील व शेगाव शहरातील अध्यक्ष ,पदाधिकारी ,नगरसेवक व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
Saint Nagri Shegaon समारोपावेळी रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, आजचा कार्यकर्ता हा केवळ राजकीय कार्यकर्ता नसून समाजसेवक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या सोडविणे हीच खरी सेवा आहे. आगामी काळात बूथ स्तरापर्यंत संघटन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन धर्मपाल मेश्राम यांनी केले, तर शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. दिनेश सूर्यवंशी यांनी आभार मानले. या कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांना संघटनात्मक कौशल्य, प्रभावी संवाद आणि योजनांची अंमलबजावणी याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाल्याने आगामी काळात पक्षकार्य अधिक सक्षमपणे राबविण्यास बळ मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कार्यशाळा प्रशिक्षण नसून संघटन विस्ताराच प्रभावी साधन :-डॉ. कुटे
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान हे केवळ प्रशिक्षण नसून संघटन विस्ताराचे प्रभावी साधन आहे. कार्यकर्त्यांनी या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून बूथस्तरावर पक्ष अधिक सक्षम करावा. जनतेशी थेट संवाद साधत शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हीच खरी कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी आहे.असे स्पष्ट मत प्रदेश सरचिटणीस आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कार्यक्रमा च्या प्रस्तावनेत व्यक्त केले