बुलढाणा,
Sanjay Gaikwad शहरात अवैध दारू विक्री करणार्या अतिक्रमणा विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, आ. संजय गायकवाड यांच्या तक्रारवजा सूचनेनंतर नगरपालिकेने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शहरातील विविध भागांत धडक मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान बसस्टॅण्डमागील जांभरुण रोड, कोर्ट रोड, जयस्तंभ चौक तसेच इतर परिसरांमध्ये अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सुमारे ८० टपर्या व हातगाड्या हटविण्यात आल्या. विशेष म्हणजे, या कारवाईत ६० हातगाड्यांवर हजार ते दीड हजार दारूच्या बाटल्या आढळून आल्या, ज्यामुळे शहरात अवैध दारू विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले असल्याचे स्पष्ट झाले. या अवैध व्यवसायामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला होता आ. संजय गायकवाड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली. नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे शहरातील अवैध दारू विक्रीला मोठा आळा बसला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. नगर प्रशासनाने भविष्यातही अशा अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.