अमरावती,
Spandan Kapile बडनेरा येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आणि प्रतिभावान सलामीवीर फलंदाज स्पंदन कपिले याची ६९ व्या शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र अंडर -१७ संघात निवड झाली आहे. स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित ही स्पर्धा तेलंगणातील जडचेरला येथे २६ एप्रिल ते १ मे दरम्यान होणार आहे. सध्या स्पंदन लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला आहे. जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आणि अहमदनगर (अहिल्यानगर) येथे झालेल्या निवड चाचण्यांमध्ये दमदार प्रदर्शन करत त्याने महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. क्रीडा क्षेत्राबरोबरच त्याने अलीकडे जाहीर झालेल्या सीबीएससी परीक्षेतही गुणवत्तापूर्ण गुण मिळवले आहेत.
सलामीवीर फलंदाज म्हणून स्पंदनने निवड चाचण्यांदरम्यान सातत्यपूर्ण फलंदाजी, तांत्रिक कौशल्य आणि संयम दाखवून निवड समितीचे लक्ष वेधले. अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. स्पंदन प्रशिक्षक संदीप गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतो. त्याचे वडील प्रा. डॉ. विनोद कपिले (माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू व एनआयएस प्रशिक्षक) यांचेही त्याला मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख अक्षय लव्हाळे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
शाळेचे प्राचार्य नितीन Spandan Kapile कोळी यांनीही त्याचे कौतुक करत, ही निवड त्याच्या प्रतिभेची आणि शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नांची साक्ष असल्याचे नमूद केले. स्पंदनने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आजोबा विठ्ठलराव कपिले, आजी रजनी कपिले, काका प्रवीण कपीले, काकू जयश्री कपिले, बहिणी अदिरा व आराध्या, गुरूजनांना व अकॅडमीचे सदस्य तसेच मामा प्रुल शिरभाते, आत्या रंजना शिरभाते, अभिराज शिरभाते आणि सर्व हितचिंतकांना दिले आहे. या यशाबद्दल सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.