नागपूर,
ST E-Bus एसटीच्या तोट्यात सर्वांत मोठा वाटा ई-बसचा असून, नागपूर विभागाला तोट्याचा फटका बसत असल्याने हा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. नागपूर विभागात एसटी कर्मचारी संवाद यात्रेनिमित्त पत्रकारांशी बोलत होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नागपूर विभागाला ४.६७ कोटींचा तोटा झाला होता. २०२५-२६ मध्ये १४.१५ कोटींचा तोटा केवळ ई बस वाहतुकीपोटी सहन करावा लागला. एसटीकडे राज्यभरात ७३८ ई बस असून, त्यातील ६३ ई बस नागपूर विभागात आहेत. एकूण वाहतुकीच्या १४ टक्के ई बसची आहे. ई बस प्रकल्प हा भाडे तत्त्वावरील असून, राज्यभर प्रकल्पामुळे प्रति किलोमीटरला सरासरी २४ रुपये तोटा सहन करावा लागतो. नागपूर विभागात सुद्धा तोट्याचे प्रमाण मोठे असून, चालू आर्थिक वर्षात मार्च अखेर नागपूर विभागाचा एकूण तोटा ५० कोटी १३ लाख रुपये झाला. केवळ ई बसमुळे नागपूर विभागाच्या तोट्यात कोटी, १५ लाख रुपयांची भर पडली. हा प्रकल्प असाच पुढे राहिला तर राज्यातील एसटीची एकूण व्यवस्था कोलमडून पडेल.
ST E-Bus साधारण बसचे भाडे प्रति टप्पा १०.०५ रुपये इतके असताना, ई बसचे भाडे मात्र प्रत्येक टप्प्याला १३.८० (९ मीटर ई बस) आणि १५.१५ रुपये (१२ मीटर ई बस) आहे. सरासरी साधारण बस ई बसच्या दरात तुलना केल्यास ई बस प्रवासाकरिता जवळपास ३० टक्के जास्त प्रवास भाडे प्रवाशांना मोजावे लागते. ई बसचे भाडे साध्या बसच्या तुलनेत जास्त असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी ई बसकडे पाठ फिरवली आहे. डिझेलवर खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला. अर्थात ई बसचा इंधन खर्च होत असताना डिझेलच्या तुलनेत भाडे कमी का नाही, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.