‘मन की बात’ ऐकण्यात बल्लारपूर अग्रेसर असेल

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
आ. सुधीर मुनगंटीवार यांचा संकल्प

चंद्रपूर, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या संवादमालिकेच्या 130 व्या भागाच्या निमित्ताने, हा कार्यक्रम ऐकण्यात बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात अव्वल राहिली असे लक्ष्य ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावे, अशी सूचना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री Sudhir Mungantiwar आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
 
 
Sudhir Mungantiwar
 
‘मन की बात’ हा कार्यक्रम जगात एकमेवाद्वितीय असून, कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांनी राजकारणविरहित पद्धतीने जनतेशी थेट संवाद साधण्याचा हा अभिनव उपक्रम राबविला नसल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले. 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या या कार्यक्रमात स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक परिवर्तन, कला-संस्कृती आदी विषयांवर भर दिला जातो. भारतातील 22 अधिकृत भाषांमध्ये तसेच 29 बोलीभाषांमध्ये या कार्यक्रमाचे भाषांतर होत असल्याने तो सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
 
 
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात एकूण 366 बूथ असून, 2024 च्या आकडेवारीनुसार सुमारे 3 लाख 12 हजार 355 नोंदणीकृत मतदार आहेत. मात्र, ‘मन की बात’ हा कार्यक्रम मतदारांसोबतच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्येही सकारात्मक संस्कार घडवण्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. यावेळी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी ब्रिजभूषण पाझारे यांची संयोजक म्हणून, तर काशी सिंग यांची सहसंयोजक म्हणून आ. मुनगंटीवार यांनी नियुक्ती केली आहे. तसेच 26 एप्रिल रोजी विसापूर येथे होणार्‍या ‘मन की बात’ कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून सहभाग नोंदवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. इतिहासातील दांडी यात्रेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, छोट्या कृतीतूनही मोठे परिवर्तन घडू शकते. प्रत्येक कार्यकर्त्याच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांतूनही मोठे यश साध्य होऊ शकते. सदस्यता अभियानात अव्वल स्थान मिळवल्यानंतर आता ‘मन की बात’ कार्यक्रमातही बल्लारपूरला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प Sudhir Mungantiwar  आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.