नवी दिल्ली,
swati-maliwal : आम आदमी पक्षाच्या दहापैकी सात खासदारांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी एका पत्रकार परिषदेत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी आणखी चार खासदारांनी पक्षातून राजीनामा दिल्याचेही जाहीर केले. त्यांनी उल्लेख केलेल्या चार खासदारांमध्ये हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत सिंग साहनी आणि स्वाती मालीवाल यांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाच्या सात खासदारांच्या एकाच वेळी झालेल्या राजीनाम्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. आता, स्वाती मालीवाल यांनी 'एक्स'वर एक पोस्ट टाकून अरविंद केजरीवाल आणि पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
'मी नोकरी सोडून राष्ट्रसेवेचा मार्ग निवडला'
स्वाती मालीवाल यांनी X वर लिहिले, "२००६ मध्ये, मी माझी नोकरी सोडून राष्ट्रसेवेचा मार्ग निवडला. आरटीआय आंदोलन, अण्णा आंदोलन, आम आदमी पक्षाची स्थापना आणि दिल्ली महिला आयोगातील आठ वर्षांच्या समर्पित कार्यापर्यंत, मी प्रत्येक टप्प्यावर पूर्ण प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने योगदान दिले. आज, आम्हाला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, अरविंद केजरीवाल आणि संपूर्ण आम आदमी पक्ष, त्यांच्या सांगण्यावरून, त्या तत्त्वे, मूल्ये आणि प्रामाणिक राजकारणाच्या वचनबद्धतेपासून भरकटले आहेत, ज्यांच्या आधारे आम्ही हा प्रवास सुरू केला होता." "मी आज पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे."
मालीवाल यांनी पुढे लिहिले, "त्यांच्याच सांगण्यावरून त्यांच्या निवासस्थानी माझ्यावर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला आणि माझा अपमान करण्यात आला. त्यांनी आपल्या हस्तकाचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्याला उच्च पदे देऊन पुरस्कृत केले. त्यांनी मला संपवण्याची धमकी दिली आणि शक्य ते सर्व प्रयत्न केले. केजरीवाल यांच्या आश्रयाखाली आम आदमी पक्षात बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांवरील छळ आणि हल्ल्याच्या घटना, गुंड प्रवृत्तींना मिळणारे प्रोत्साहन, आणि पंजाबची फसवणूक व लूट पाहता, मी आज पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी एका संसदीय समितीच्या बैठकीसाठी इटानगरमध्ये होते. आज रात्री दिल्लीला परतल्यानंतर मी या विषयावर सविस्तर चर्चा करेन."