ट्रम्प यांची यू-टर्न; भारताला म्हटले महान देश!

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump calls India a great country अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे भारतात वाद निर्माण झाला आहे. एका चर्चेच्या नोंदीत भारतासह काही देशांविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप होताच भारताने त्यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्टपणे सांगितले की अशा प्रकारची विधाने वस्तुस्थिती दर्शवणारी नाहीत आणि भारत-अमेरिका संबंधांशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी असेही नमूद केले की ही टिप्पणी अपूर्ण माहितीवर आधारित आहे. वाद वाढल्यानंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भारताबद्दल सकारात्मक विधान केले. नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी भारताला एक महान देश संबोधले असून दोन्ही देशांमधील संबंध चांगले असल्याचेही म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीही त्यांनी सकारात्मक सूर व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.
 
 
 
great country
ही वादग्रस्त टिप्पणी एका राजकीय चर्चेदरम्यान समोर आली होती, जिथे अमेरिकेतील नागरिकत्व धोरणावर चर्चा सुरू होती. त्या संदर्भात काही देशांविषयी वापरलेल्या शब्दांमुळे हा वाद निर्माण झाला. या प्रकरणावर भारतातील राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या असून काँग्रेस पक्षाने या वक्तव्याचा निषेध करत केंद्र सरकारने हा मुद्दा अमेरिकेसमोर ठामपणे मांडावा, अशी मागणी केली. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनीही या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत भारताचा अपमान सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.