मुख्यमंत्र्यांना निवेदन
उमरखेड,
Umarkheed Petrol Pump शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सारडा पेट्रोलपंपाच्या लीज नूतनीकरणाविरोधात शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी तीव‘ आक्षेप नोंदवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. संबंधित पेट्रोलपंप हटवून दुसरीकडे करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी उमरखेड येथील गावठाणातील प्लॉट क‘मांक ३६२ (क्षेत्रफळ ३०३ चौ. फूट) या जागेवरील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाला पुढील पाच वर्षांसाठी लीज नूतनीकरण करून दिल्याचा आदेश दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Umarkheed Petrol Pump निवेदनानुसार, हा पेट्रोल हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ असून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानेही या पंपाबाबत अडचणी दर्शविल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सुमारे ३०० आक्षेप प्राप्त होऊनही जनसुनावणी न घेता लीज वाढविण्यात आल्याने जनभावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पेट्रोलपंपावर स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा मूलभूत सोयींचा अभाव असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मध्यवस्तीत असलेला हा ज्वलनशील पंप सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित पेट्रोलपंप अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध असल्याचा दावा करत, जनसुनावणी घेऊन या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख चितांग कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण मिराशे, रमेश चव्हाण यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.