नांदगाव पेठ,
vehicle theft विश्वासघाताने चोरून नेलेली मालमत्ता हस्तगत करत नांदगाव पेठ पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली असून, सुमारे ३ लाख ८९ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंपनीमध्ये लावलेले वाहन आणि त्यामध्ये असलेले साहित्य आरोपींनी लंपास केले होते. मात्र पोलिसांनी तपास करून या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक केली.
मोर्शी तालुक्यातील निंभी येथील मारुती अंबादास इंगोले यांनी ३० मार्च २०२६ रोजी नांदगावपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपले मारुती कॅरी वाहन हे मुंबई येथील हायड्रोमेक सिस्टम प्रा. लि. कंपनीकडे भाडे करारावर दिले होते. कंपनीतील मजूर या वाहनाद्वारे नांदगावपेठ ते माहुली जहांगीर दरम्यान साहित्याची वाहतूक करीत होते. मात्र, ३० मार्च रोजी इंगोले साईटवर गेले असता त्यांचे वाहन व त्यातील साहित्य आढळून आले नाही. संबंधित मजुरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे एकूण ३ लाख ८९ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल विश्वासघाताने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने आरोपींचा माग काढला असता त्यांचे लोकेशन मध्यप्रदेशातील गंधावल (जि. बडवाणी) येथे आढळून आले. त्यानुसार नांदगावपेठ पोलिसांचे पथक तात्काळ रवाना करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना गंधावल येथून ताब्यात घेतले तसेच चोरीस गेलेली मालमत्ता बंजारी, ता. मनावर, जि. धार, मध्यप्रदेश येथून हस्तगत करण्यात आली.
यामध्ये आरोपी अमरनाथकुमार राजवली साहणी (वय २६), प्रमोदकुमार राजवली साहणी (वय ३०), ओमकुमार राजवली साहणी (वय २८), नौशाद अली मोहम्मद ईसा (वय २५) आणि मनोजकुमार संभू मांजी (वय २०) सर्व रा. साहेबगंज, जि. मुझफ्फरनगर, राज्य बिहार यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे व सपोनी रितेश राऊत यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उप निरीक्षक गणेश राऊत, कर्मचारी राजाभाऊ राऊत, नीलेश साविकार, शोएबुद्दीन सय्यद, वैभव तिखिले, अमित ढोले, गोकुळ दारोकार यांनी पार पाडली.