देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप
गोंदिया,
Women's Reservation: Vandana Kale महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात सप्टेंबर २०२३ मध्ये राज्यसभा आणि लोकसभेत प्रस्ताव एकमताने पारीत झाला. राजकीय आरक्षणाचा पायंडाच काँग्रेसने घातला आहे. आधीच पारीत झालेल्या प्रस्तावाला कायद्याचे स्वरूप देण्यात आले नाही. उलट महिला आरक्षणाची आड घेवून सत्ताधारी भाजपने चुकीच्या परिसिमनाचा प्रस्ताव पारीत करण्याचा कुटील डाव रचला होता. तो डाव विरोधी पक्षाने हाणून पाडला. सत्ताधारींचा डाव उधळून लावल्यामुळे आता भाजप काँग्रेसवर खोटा आरोप करत असून हा चोरांच्या उलट्या बोंबा असाच प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे यांनी केला.
Women's Reservation: Vandana Kale येथील शासकीय विश्रामगृहात आज, २४ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, अमर वराडे, राजेश चांदेवार, राजू काळे, विमल कटरे आदी उपस्थित होते. वंदना काळे म्हणाल्या, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज व्यवस्थेत आरक्षण लागू केले. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले. ते आरक्षण आता महाराष्ट्रात ५० टक्क्यांवर आहे. काँग्रेसने नेहमीच महिला नेतृत्वाला स्थान दिले. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि पक्षाचे अद्यक्षपद देखील महिलांना दिले. उलट भाजप दुटप्पी भूमिका खेळत असून त्यांनी आजपर्यंत महिलांना दुय्यम लेखले आहे. लोकसभा आणि राज्यसभेत २०२३ मध्येच महिला आरक्षण विधेयक पारीत झाले असताना त्याला लागू करण्यात आले नाही. उलट महिला आरक्षणाच्या आड चुकीचे परिसिमन करण्याचा डाव रचण्यात आला होता. त्या परिसिमनात ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती यांच्यावर अन्याय होणार होता. त्यामुळे परिसिमन बिल नाकारल्यामुळे सत्ताधारी भाजपची नाचक्की झाली. त्यामुळे त्यांचे मनसुबे हाणून पडल्याने आता काँग्रेसवर खोटे आरोप करत आहेत. भाजपमध्ये जराही महिलांप्रती निष्ठा असेल तर २०२३ मध्ये पारीत झालेले विधेयकाचे कायद्यात रुपांतर करावे, काँग्रेस त्याचे समर्थन करेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.