चिचपल्लीचे बांबू संशोधन केंद्र देशासाठी आदर्श ठरावे

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूर, 
चिचपल्ली येथील Bamboo Research Center बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे केवळ चंद्रपूरपुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणारे संशोधन, प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीचे सक्षम केंद्र बनावे, असा विश्वास माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आ. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्राला केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता संशोधन, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीचे सक्षम केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
 
 
Mungantiwar
 
बांबू फर्निचर, बांबू तंतू, वस्त्रोद्योग, बांबूपासून खाद्यपदार्थ, इंधन निर्मिती, बांबू इंधन गोळे तसेच विविध नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीवर विशेष भर देत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बांबू फर्निचरचा वापर वाढविण्यासाठी शासन निर्णय काढण्याबाबत मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक रामानुजन, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक शुक्ला, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, कार्यकारी अभियंता पूनम वर्मा, सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे, डॉ. तारिका दगडकर आदी उपस्थित होते.

 
Bamboo Research Center  यावेळी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते वनश्री बांबू दालन या बांबू स्मरणिका दुकानाचे उद्घाटन तसेच बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. या केंद्रात ‘संशोधन’ आणि ‘प्रशिक्षण’ हे दोन महत्त्वाचे घटक असून, संशोधनासाठी आवश्यक भौतिक साधनसामग्री, मनुष्यबळ, खर्च आणि उद्दिष्टे स्पष्टपणे निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. चीन, फिलिपिन्स यांसारख्या देशांमध्ये बांबूपासून होणार्‍या विविध उत्पादनांचा अभ्यास करण्यासाठी चार ते पाच सदस्यांची विशेष समिती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. निती आयोगाकडे संशोधनासाठी राखीव निधी उपलब्ध होण्यासाठी सविस्तर प्रस्ताव आणि प्रभावी सादरीकरण तयार करून पाठविण्याचे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले.