भूजल पातळी वाढवण्यास ‘जलतारा’ संकल्पनेंतर्गत शेत शोषखड्डा योजना
दिनांक :25-Apr-2026
Total Views |
शेतकऱ्यांनी शेतात शोषखड्डा तयार करावा
प्रथम अर्ज- प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ मिळणार
यवतमाळ,
भूजल पातळी वाढवण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित यंत्राद्वारे Agricultural drainage scheme शेत शोषखड्डा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शोषखड्डा तयार करता येणार आहे. शेतकऱ्यांना शेत शोषखड्डा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शासनामार्फत राबविण्यात येणारी ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित शेत शोषखड्डा योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश राहणार आहे.
विहिरी कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत आहे. भूजल पातळी सातत्याने घटत आहे. अतिवृष्टीमुळे मातीची धूप होऊन सुपीकता कमी होत आहे. या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून शेतात पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे हा यामागील उद्देश असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. शोषखड्ड्यामुळे जमिनीत मुरलेले पाणी विहिरी व कुपनलिकेतील पाणी पातळी जिवंत ठेवते. पिकांना आवश्यक पाणी मिळाल्याने उत्पादन वाढते. मातीची सुपीकता टिकून राहते व खतांचा खर्च कमी होतो. दुष्काळाचा परिणाम कमी होण्यास मदत होते. अतिवृष्टीच्या वेळी पाणी साचत नसल्याने पिकांचे नुकसान टळते.
प्रति एकर किमान एक Agricultural drainage scheme शेत शोषखड्डा आवश्यक असून त्याचा आकार 1.5 मिटर बाय 1.5 मिटर बाय 1.8 मिटर असा ठेवण्यात येणार आहे. लाभार्थ्याकडे अॅग्रीस्टॅक फार्म आयडी असणे आवश्यक आहे. सातबारा उतारा स्वतःच्या नावावर असणे, किमान 0.10 हेक्टर क्षेत्र व संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र आवश्यक आहे. ही योजना डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण किंवा ई-निविदा पद्धतीने राबविण्यात येणार असून प्रथम अर्ज - प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभ दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालय किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.