मुंबई/पुणे
Amrit Bharat Express महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांना जोडणाऱ्या रेल्वे प्रवासाला आणखी वेग आणि परवडणारी सुविधा मिळणार असून रेल्वेने 22589/22590 वाराणसी–हडपसर–वाराणसी अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या सेवेमुळे पूर्वांचल, अवध आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना आरामदायी आणि तुलनेने कमी खर्चातील प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
शुक्रवारी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन नव्या एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामध्ये वाराणसी–हडपसर अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश असून या सेवेमुळे महाराष्ट्रातील पुणे, मुंबई तसेच परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ही गाडी वाराणसी धाम जंक्शन ते पुण्यातील हडपसर स्थानकादरम्यान धावणार आहे. मार्गामध्ये ग्यानपूर रोड, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी, उरई, झांसी, बीना, राणी कमलापती, नर्मदापुरम, इटारसी, हरदा, खांडवा तसेच महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन अशा महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. या मार्गामुळे उत्तर आणि Amrit Bharat Express पश्चिम भारतातील अनेक महत्त्वाची शहरे थेट रेल्वेने जोडली जाणार आहेत.22589 अप वाराणसी–हडपसर अमृत भारत एक्सप्रेस वाराणसीहून सायंकाळी 6.15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.10 वाजता हडपसर येथे पोहोचेल. तर 22590 डाऊन हडपसर–वाराणसी अमृत भारत एक्सप्रेस हडपसरहून सकाळी 7.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 2.30 वाजता वाराणसी येथे पोहोचेल.या गाडीत एकूण 22 डबे असणार असून त्यामध्ये जनरल सेकंड क्लास आणि स्लीपर कोचेसचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वस्त दरात आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
अमृत भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक, शैक्षणिक तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होणार असून या मार्गावर प्रवासी वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मुंबई आणि पुणे परिसरातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक महत्त्वाचा आणि सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.