- देवरी तालुक्यातील डवकी येथील घटना
गोंदिया,
Bee attack देवरी तालुक्यातील डवकी येथील जंगल शिवारात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढविल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत तीन महिला व एक पुरुष जखमी झाले असून, एका वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जयवंता लक्ष्मण बागडे (७०), धनंजय हिरालाल सोरले (५८), पूजा अनिल नुरेटी (१८) आणि जयश्री ऋषिपाल उईके (१६) अशी जखमींची नावे आहे. त्यापैकी जयवंता बागडे या गंभीर जखमी झाल्या आहे.
Bee attack मिळालेल्या माहितीनुसार, जयवंता बागडे या शुक्रवारी पहाटे जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेल्या होत्या. परिसरात शांत वातावरण असताना अचानक मधमाश्यांच्या थव्याने त्यांच्यावर झडप घातली. अनपेक्षित हल्ल्याने त्या घाबरून मदतीसाठी धावू लागल्या. यावेळी जवळील पोल्ट्री फार्मकडे त्या गेल्या असता, तेथे उपस्थित धनंजय सोरले यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक मधमाश्यांनी त्यांनाही लक्ष्य केले. याचवेळी भागी गावाहून डवकीटोलाच्या दिशेने येत असलेल्या पूजा नुरेटी आणि जयश्री उईके या दोन तरुणींवरही मधमाश्यांनी हल्ला केला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःचा बचाव केला. घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारांनंतर पूजा नुरेटी आणि जयश्री उईके यांना घरी पाठविण्यात आले, तर जयवंता बागडे आणि धनंजय सोरले यांच्यावर उपचार सुरू आहेत.