आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपदा प्रतिसाद किट बाबत प्रशिक्षण
वाशीम,
आपत्तीच्या प्रसंगी त्वरित, समन्वयित आणि प्रभावी प्रतिसाद देणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी सर्व यंत्रणांनी सदैव सज्ज राहावे, असे प्रतिपादन Collector Yogesh Kumbhejkar जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. येथील नियोजन भवन सभागृहात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपदा प्रतिसाद किट बाबत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी यावेळी आपदा प्रतिसाद किटचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी किटमधील साहित्याचा योग्य व प्रभावी वापर होणे आवश्यक आहे.
Collector Yogesh Kumbhejkar संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने कार्य करत समन्वय साधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रशिक्षणादरम्यान आपदा प्रतिसाद किटमध्ये असलेल्या विविध साहित्याची माहिती, त्यांचा प्रत्यक्ष वापर, तसेच आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक दक्षता व नियोजन याबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, प्रशिक्षक संतोष बैले आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशिक्षणाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आपदा मित्र, आपदा सखी आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रशिक्षणामुळे संबंधित यंत्रणांची आपत्ती हाताळण्याची क्षमता अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.