नाफेड खरेदीत गोंधळ; पोर्टल अचानक बंद

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
मोजणीसाठी आलेले शेतकरी परतले
 
तिवसा, 
Confusion in Nafed procurement तालुक्यात बारदाण्याच्या टंचाईमुळे तब्बल वीस दिवस ठप्प असलेली नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी प्रक्रिया २० एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली आणि शेतकर्‍यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. मात्र ही आशा फार काळ टिकली नाही. खरेदीला सुरुवात होताच काही प्रमाणात मोजणी सुरू झाली असतानाच अचानक पोर्टल बंद झाल्याने पुन्हा संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागल्याचे चित्र समोर आले आहे.
 
 
nafel
 
Confusion in Nafed procurement बारदाणा उपलब्ध झाल्यानंतर तिवसा नाफेड केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला हरभरा घेऊन दाखल झाले होते. ट्रॅक्टर व मालवाहू वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. अनेक दिवस प्रतीक्षेत असलेले शेतकरी आज तरी माल विक्री होईल या आशेने केंद्रावर आले होते. सुरुवातीला कालपर्यंत काही शेतकर्‍यांच्या मालाची मोजणीही पार पडली. अधिकृत माहितीनुसार, जवळपास १५०० शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी केवळ सुमारे १८५ शेतकर्‍यांची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित हजारो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच २४ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजता नाफेड पोर्टल बंद करण्यात आल्याने दुसर्‍याच दिवशी केंद्रावर आलेल्या शेतकर्‍यांना मोठा धक्का बसला.पोर्टल बंद असल्यामुळे मोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आणि अनेक शेतकर्‍यांना आपला माल परत न्यावा लागला. यामुळे वाहतूक खर्च, मजुरी आणि वेळेचे मोठे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले. बाजारात दर कमी असल्यामुळे हमीभावाच्या अपेक्षेने नाफेडकडे वळलेल्या शेतकर्‍यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे.

वरिष्ठांशी संपर्क सुरू
-काही दिवसांपूर्वी बारदाण्याअभावी खरेदी थांबली होती, आणि आता पोर्टल बंद झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. शेतकर्‍यांना केंद्रावर आणलेला माल परत न्यावा लागत असून त्यांना आर्थिक फटका बसत आहे. या संदर्भात वरिष्ठांशी सतत संपर्क सुरू असून लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-दीपक गोफणे
व्यवस्थापक नाफेड केंद्र, तिवसा