८ लाखांचे बोगस कापूस बियाणे जप्त

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
कृषी व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई
 
अमरावती, 
Fake cotton seeds seized नंदूरबार येथून धामणगाव रेल्वे तालुक्यात जाणारे ८ लाखांचे बोगस, शासनाकडून प्रतिबंध असलेले कापूस बियाणे कृषि विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने अमरावतीच्या रेल्वे स्टेशन परिसरातून जप्त केले. या प्रकरणी एका आरोपीस अटक केली असून दुसर्‍या आरोपीचा शोध सुरू आहे.
 
 
Fake cotton
 
Fake cotton seeds seized  शासनाने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणांचे पार्सल रेल्वेने येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे पथक व शहर पोलिस गुन्हे शाखेचे पथक अमरावती रेल्वे स्टेशन परिसरात दबा धरून बसले असता पार्सल ऑफीस परिसरात एका इसमाजवळ काही संशयास्पद गोणी असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन त्याने आपले नाव चेतन सुखलाल ठाकरे असे सांगितले. त्याच्याजवळ असलेल्या पोत्यांमध्ये व्हाईट गोल्ड ५ जी कॉटन सिडचे ४ लाख ७३ हजार रुपये किमतीचे ४७३ पाकीट, धुम २ सिडचे ३ लाख ६ हजार किमतीचे ३०६ पाकीटे, हायब्रीड सिडचे २६ हजार रुपयांचे २६ पाकीटे, असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा माल पथकाने जप्त केला व चेतन ठाकरे याला ताब्यात घेतले. तो धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील रहिवासी आहे. या प्रकरणात नंदूरबारचा विशाल प्रकाश भोईर हा फरार आरोपी असून त्याचा तपास सुरू आहे. आरोपीस सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक दशरथ आडे, महेश इंगोले, सहाय्यक निरीक्षक मनिष वाकोडे, उपनिरीक्षक गजानन सोनुने यांच्यासह अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी केली.