शेकडो हेक्टर जमीन विळख्यात
धारणी,
Fire in Dhakna forest चिखलदरा आणि घटांग ते सेमाडोह दरम्यानच्या घाटवळणातील जंगलात काही दिवसांपूर्वी लागलेली आग यावर्षीची सर्वात भयंकर मानली जात असताना आता गुगामलच्या ढाकणा परिक्षेत्राच्या जंगलात शुक्रवार, २५ एप्रिलला भीषण वणवा पेटून शेकडो झाडांची राखरांगोळी झाल्याने वन्य प्राण्यांवर संकट कोसळलेले आहे.
धारणीपासून २० कि. मी. अंतरावरील ढाकणा परिक्षेत्रामधील खारी, सिडूकुंड आणि डेगूपाटी व अढाव शिवारातील शेतांना लागून असलेल्या राखीव जंगलात २५ एप्रिलला सकाळपासून आग लागलेली होती. माहिती मिळताच आरएफओ चौधरी यांनी आग प्रतिबंधक पथकाला तत्काळ रवाना केले. ढाकणा हे मुख्यालयाचे गाव असल्याने सर्वच कर्मचारी हजर होते. परिणामी जंगलातील आग भीषण वणवा होण्यापूर्वीच आटोक्यात आणली होती, अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे. एका माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आगीचे प्रमाण कमी असले तरी धारणी-ढाकणा भागात सूर्यदेव साक्षात आग ओकत असल्याने जंगलात आग लागण्याचे प्रमाण वाढू शकते म्हणून हरिसाल, चौराकुंड, तारुबांदा तथा प्रादेशिकच्या धारणी व सुसर्दा परिक्षेत्राच्या जंगलाकडे सतत लक्ष देण्याची गरज आहे.
Fire in Dhakna forest ढाकणा जवळच्या खारी व डेगूपाटीच्या जंगलात आग लागल्याने वन्यप्राण्यांची पण प्रचंड धावपळ झाल्याची गंभीर माहिती असून तापमान ४३ च्यावर गेल्याने वन्यजीव संकटात सापडल्याची गंभीर बाब मानली जात आहे. विशेष असे की, ढाकणाच्या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, सांबर, हरिण यासह अतिदुर्लभ चांदी अस्वल, सर्प, गरुड व गिधाड सारखे अनेक वन्यजीव वास करत असतात. जंगलात लागलेल्या आगीमुळे पक्षी, तृणभक्षी प्राणी तथा अस्वलीला प्रचंड धोका असतो. याशिवाय जंगलातील तापमान वाढून वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक विचरणात बाध उत्पन्न होत असते. ढाकणा भागात आग लागण्याचे प्रमाण नेहमी जास्त राहत असल्याने फायर फाईटर पथकाला नेहमी सज्ज राहण्याची गरज आहे. सॅटेलाईटचा उपयोग करण्याची मागणी होत आहे.