वडिलांविरुद्ध के.कवितांचा नवा ‘टीआरएस’ मैदानात

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
हैद्राबाद,
K. Kavita's TRS तेलंगणाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष उभारण्याची घोषणा केली आहे. ‘तेलंगणा राष्ट्र सेना’ या नावाने नव्या पक्षाची स्थापना करत त्यांनी आपल्या वडिलांच्या भारत राष्ट्र समितीपासून पूर्णपणे वेगळा मार्ग स्वीकारला आहे.मेडचल जिल्ह्यातील मुनिराबाद येथे झालेल्या भव्य सभेत कविता यांनी पक्षाचा ध्वज, नाव आणि पुढील धोरणांचा आराखडा जाहीर केला. या कार्यक्रमाला राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित राहिले होते. तेलंगणाच्या ओळखीशी निगडित असलेले ‘टीआरएस’ हेच संक्षिप्त नाव कायम ठेवून त्यांनी राज्यकेंद्रित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा स्पष्ट संदेश दिला.
 

k kavitha new party 
कविता यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग राहिला आहे. ‘तेलंगणा जागृती’ या संस्थेमार्फत त्यांनी राज्यनिर्मितीच्या चळवळीत भूमिका बजावली होती. या संस्थेचे राजकीय पक्षात रूपांतर होईल, अशी चर्चा काही काळापासून सुरू होती; मात्र नव्या पक्षाच्या घोषणेनंतर त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.एकेकाळी तेलंगणाच्या राजकारणावर प्रभाव गाजवणाऱ्या ‘तेलंगणा राष्ट्र समिती’चे नाव २०२२ मध्ये बदलून भारत राष्ट्र समिती करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कविता यांनी जुन्या नावाशी साधर्म्य असलेला पक्ष उभारून आपला वेगळा राजकीय मार्ग ठळक केला आहे. पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांनंतर त्यांनी यापूर्वीच भारत राष्ट्र समिती तसेच विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. आता नव्या पक्षाच्या स्थापनेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.