मुंबई
Karan Wahi ‘दिल मिल गए’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करण वाही सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल आणि जीवनशैलीतील बदलांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. मात्र, या मुलाखतीतील काही अंश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याने अभिनयक्षेत्र सोडल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या पार्श्वभूमीवर स्वतः करणने पुढे येत या अफवांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
व्हायरल क्लिपमध्ये करणने मांसाहार सोडल्याचे आणि सात्विक जीवनशैली स्वीकारल्याचे सांगितले होते. त्याच्या या विधानाचा चुकीचा अर्थ लावत अनेकांनी तो आता पूर्णपणे अध्यात्माच्या मार्गावर गेला असून अभिनय क्षेत्रापासून दूर झाला असल्याचा दावा केला. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत करणने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.
“अध्यात्मिक होणे म्हणजे काम सोडणे नव्हे. कृपया केवळ व्हायरल होण्यासाठी अशा अफवा पसरवू नका,” असे स्पष्ट शब्दांत त्याने नमूद केले. तसेच संबंधित पोस्ट हटवण्याची विनंती करत खोटी माहिती पसरवू नये, असेही त्याने आवाहन केले. या प्रतिक्रियेनंतर करणने अभिनयक्षेत्रात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, एका पॉडकास्ट Karan Wahi मुलाखतीत करणने आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांविषयी अधिक माहिती दिली. तो म्हणाला की, गेल्या काही महिन्यांपासून तो नामजपाचा अभ्यास करत आहे आणि वृंदावनहून आणलेली तुळशीची माळ घालतो. गेल्या तीन महिन्यांपासून त्याने मांसाहार पूर्णपणे सोडला असून यामुळे त्याच्या आयुष्यात शांतता आणि सकारात्मकता वाढल्याची भावना त्याने व्यक्त केली. नीम करोली बाबा आणि प्रेमानंद महाराज यांच्या शिकवणींचा स्वतःवर मोठा प्रभाव पडल्याचेही त्याने सांगितले.याच मुलाखतीत करणने अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही भाष्य केले. “आमच्या नात्याबद्दलच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत,” असे स्पष्ट करत त्याने सर्व अफवांना पूर्णविराम दिला.करण वाहीने ‘रिमिक्स’, ‘दिल मिल गए’ आणि ‘बात हमारी पक्की है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच सूत्रसंचालक म्हणूनही त्याने वेगळी ओळख निर्माण केली असून ‘झलक दिखला जा’ आणि ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या कार्यक्रमांमध्येही तो झळकला आहे. सध्या त्याच्या अध्यात्मिक प्रवासाबरोबरच त्याच्या करिअरबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.