- शासनाकडून महालॅब प्रकल्प बंद
गोंदिया,
Mahalab project closed कोरोना काळात जिवाची पर्वा न करता रक्ताचे नमुने गोळा करणार्या महालॅबच्या (फ्लेबोटॉमिस्ट) रक्त संकलन कर्मचार्यांच्या त्याकाळात कोराना योद्धा म्हणून प्रसंशा करण्यात आली असताना आता हेच कोरोना योद्धा बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गरज संपली म्हणून शासनाने वार्यावर सोडले आहे का, असा संतप्त सवाल आता गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील हजारो कर्मचार्यांकडून उपस्थित केला जात आहे.
Mahalab project closed राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात मोफत रक्त तपासणी सुविधा देण्यासाठी दहा वर्षांपूर्वी शासनाकडून महालॅबच्या माध्यमातून रक्त संकलन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, शासनाकडून या कर्मचार्यांना केवळ ५,९४० रुपये मानधन देण्यात येत होते. इतक्या कमी मानधनातही दुर्गम भागात सेवा देणार्या या कर्मचार्यांकडून कर्तव्य पार पाडले जात होते. त्यातच कोरोना संक्रमण काळात या कर्मचार्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा दिली. यावेळी त्यांना कोरोना योद्धा म्हणून त्यांची प्रसंशाही करण्यात आली. मात्र, आजघडीला शासनाकडून सदर महालॅब प्रकल्पच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास ५ हजार कर्मचार्यांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयासह केटीएस जिल्हा रुग्णालय त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय व जिल्ह्यातील दहा ग्रामीण रुग्णालयाबरोबरच ५२ प्राथमीक आरोग्य केंद्र व आपला दवाखाना या ठिकाणी ८८ रक्त संकलन कर्मचारी कार्यरत असून या कर्मचार्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, या कर्मचार्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले त्याचबरोबर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या असून पुन्हा कामावर रुजू करण्याची मागणी केली आहे. तर या संदर्भात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करणार असल्याचे या कर्मचार्यांकडून सांगण्यात आले आहे.