मुंबई
Devendra Fadnavis राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या निर्णयावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत त्यांनी भाषेची सक्ती करण्याऐवजी चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल, असे संकेत दिले आहेत.
राज्यात १ मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झाला असून विविध पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला स्थानिक भाषेच्या सन्मानाशी जोडले, तर काहींनी यामुळे स्थलांतरित चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होईल अशी चिंता व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस Devendra Fadnavis यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात मराठीचा सन्मान आणि वापर वाढवणे आवश्यक आहे, मात्र कोणतीही भाषा जबरदस्तीने लादणे योग्य नाही. त्यामुळे सरकारकडून अशा चालकांसाठी मराठी भाषा शिकवण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, राज्यात सर्व चालकांनी प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी किमान मराठी समजणे आवश्यक आहे, परंतु त्यासाठी दंडात्मक किंवा सक्तीची भूमिका न घेता मदत आणि प्रशिक्षण देण्यावर भर राहील. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून काही संघटनांकडून विरोधही व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, काही राजकीय गटांनी या निर्णयाचे समर्थन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.