- गोंदियात उपवर्गीकरण विरोधात गर्जना : बदर समितीचा अहवालाची होळी
गोंदिया,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. बहुजन समाजाला एकत्र आणले. ते स्वप्न तोडण्याचा उपवर्गीकरणामार्फत सरकारी प्रयत्न आहे. समाजात फूट पाडणारा हा डाव हाणून पाडा असे आवाहन माजीमंत्री तथा MLA Rajkumar Badole आमदार राजकुमार बडोले यांनी केले. ज्या समाजाला दोन हजार वर्षांपासून अस्पृश्यतेच्या नावाखाली गावाबाहेर ठेवले, अधिकारशून्य केले, त्या संपूर्ण वर्गाला बाबासाहेबांनी संविधानाच्या ३४१ व्या कलमानुसार एकसंघ मानून आरक्षणाचे कवच दिले होते. आता त्यात तुकडे पाडून सरकार ’भावा-भावांत’ भांडण लावत आहे, असा घणाघाती आरोपही बडोले यांनी यावेळी केला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी २५ एप्रिल रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णया विरोधात उपवर्गीकरण जागर संघर्ष समितीच्या वतीने सकाळी ११ वाजजापासून धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली यावेळी आयोजित जाहिर सभेत बडोले बोलत होते. तत्पूर्वी शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, आंदोलकांच्यावतीने न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाच्या प्रतींचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. MLA Rajkumar Badole बडोले पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिला, तो संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का देणारा आहे. राज्य सरकारने घाईघाईने स्थापन केलेल्या बदर समितीत ५९ अनुसूचित जातींपैकी एकाही विद्वान लोकप्रतिनिधीला किंवा तज्ज्ञाला स्थान दिले नाही. १९३१ नंतर जातीय जनगणना झाली नसताना, सरकारकडे कोणता ’ऑब्जेक्टिव्ह डेटा’ उपलब्ध आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर उपवर्गीकरणामुळे छोट्या जातींना नेमके काय मिळणार? हा केवळ भ्रमिष्ट करण्याचा प्रकार आहे. सरकारने तात्काळ हा अहवाल सार्वजनिक करावा. संसदेत कायदा करून हा निर्णय रद्द करावा, अन्यथा हा वणवा गोंदियापासून संपूर्ण महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी आमदार विनोद अग्रवाल यांनी आंदोलनाला पाठिंबा देत आरक्षण हा संवेदनशील विषय असताना नवीन मुद्द्यांमुळे समाजात संभ्रम निर्माण होत आहे. मूळ आरक्षणाला धक्का न लावता आधी जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे असल्याचे सांगतिले. आंदोलनाच्या शेवटी स्थानिक तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले.