गडचिरोली
Naxal commander Urmila alias छत्तीसगडमधील मोहला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यात नक्षल चळवळीतील महत्त्वाची कमांडर उर्मिला ऊर्फ टेटकी हिने अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. तब्बल १३ वर्षे सशस्त्र नक्षल चळवळीत सक्रिय राहिल्यानंतर तिने शस्त्रांचा त्याग करून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतल्याने सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे.
उर्मिला ही रावघाट एरिया कमिटीतील सक्रिय कमांडर म्हणून कार्यरत होती. तिच्यावर शासनाने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अनेक वर्षे घनदाट जंगल परिसरात सशस्त्र कारवायांमध्ये सहभागी राहिल्यानंतर, सरकारच्या पुनर्वसन धोरणांचा आणि सातत्याने वाढलेल्या सुरक्षा दबावाचा परिणाम तिच्या निर्णयावर झाल्याचे सांगितले जात आहे. उर्मिला मूळची मोहला-मानपूर परिसरातील रहिवासी असून किशोरवयातच ती नक्षल संघटनेच्या संपर्कात आली होती. सुरुवातीला संघटनेत सांस्कृतिक आणि सहायक कामांपासून सुरुवात करून पुढे ती सशस्त्र कारवायांपर्यंत पोहोचली. कालांतराने ती कमांडर पदापर्यंत पोहोचली होती.
महत्वाची माहिती समोर
शरणागतीवेळी उर्मिलाने Naxal commander Urmila alias पोलिसांना काही महत्त्वाची माहिती दिल्याचेही समोर आले आहे. संघटनेतील अंतर्गत संघर्ष, अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू किंवा शरणागती आणि सतत वाढता दबाव यामुळे अनेक कार्यकर्ते संघटना सोडण्यास प्रवृत्त होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या शरणागतीमुळे मोहला-मानपूर परिसरातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून संबंधित भाग ‘नक्षलमुक्त’ होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत शरण आलेल्या नक्षलवाद्यांना आर्थिक मदत आणि समाजात पुनर्वसनाची संधी दिली जात आहे.दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात सतर्कता वाढवली असून उर्वरित सक्रिय नक्षल गटांवर दबाव आणण्यासाठी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.