महिलांच्या पाककौशल्याचे सादरीकरण : 60 स्पर्धकांचा सहभाग
बाभुळगाव,
‘Nutritious Food Exhibition’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पंचायत समिती बाभूळगाव अंतर्गत 23 एप्रिल रोजी ग्रामपंचायत मालापूर येथील समाज भवन येथे ‘पोषण पंधरवडा’ व स्व. बळवंत कामडी यांच्या स्मृतीनिमित्त तालुकास्तर पौष्टिक खाद्य पदार्थ प्रदर्शनी व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात तालुक्यातील 60 महिलांनी विविध पौष्टिक पदार्थांचे स्टॉल्स लावून आपल्या पाककौशल्याचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक गटविकास अधिकारी हेमंत नेवल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अभियान व्यवस्थापक अमित जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक (प्रथम संस्था) विपुल चौधरी, प्रभागसंघ अध्यक्ष स्वाती खोंडे, तालुका व्यवस्थापक प्रशांत मोदी, सुनील जाधव, प्रभाग समन्वयक अल्पा राठोड, विजय उघडे आणि विक्रम रामटेके (गिमोना) उपस्थित होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्व. बळवंत कामडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
‘Nutritious Food Exhibition’ गटविकास अधिकारी हेमंत नेवल यांनी महिलांनी तयार केलेले पदार्थ केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित न ठेवता, ते व्यावसायिक स्तरावर आणण्याचे आवाहन केले. तालुका व्यवस्थापक सुनील जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, तुम्ही केवळ अन्नपूर्णा नसून उद्याच्या यशस्वी उद्योजक आहात. त्यांनी चव, गुणवत्ता, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि ऋडडअख परवाना यांसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक टिप्स देऊन महिलांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
मान्यवरांनी सर्व स्टॉल्सना भेटी देऊन पदार्थांचे मूल्यांकन केले. त्यानुसार प्रथम क्रमांक स्वाती शेंडे (ग्रामसखी/कृषीसखी, कोटंबा), द्वितीय रूपाली प्रशांत द्रवेकर (अंगणवाडी सेविका, दिघी-2), तृतीय साधना महेश कामडी (नांदेसावंगी), सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी मोरेश्वर मानकर, कुणाल बुरडकर, योगराज लांडगे आणि विवेक मडकाम यांनी परिशम घेतले. सूत्रसंचालन चैताली कपिले यांनी, तर आभारप्रदर्शन दीपमाला भोयर यांनी केले.