गोपाल चिकाटे
तळेगाव (श्या.पंत),
Police night patrol squad उन्हाळी सुट्ट्या, लग्नाचा हंगाम सुरू असल्याने बरीच कुटुंबं घर बंद करून बाहेरगावी जातात. याच संधीचा फायदा घेत चोरटे आपले काम फत्ते करतात. मात्र, तळेगाव पोलिस स्टेशनने यावर प्रभावी उपाययोजना करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ठाणेदार मंगेश भोयर यांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत एक नवीन शक्कल लढवली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे पोलिस आणि जनतेतील विश्वास अधिक दृढ होत आहे. गावात नसल्यास रात्री गस्तीवर असलेले पोलिस तुमच्या घराजवळ जाऊन घर सुरक्षित असल्याचे फोटो काढतील आणि ते तुम्हाला पाठवणार आहेत. त्यामुळे तुम्ही निवांत रहा असा संदेश पोलिस देत आहेत.
Police night patrol squad सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळांना सुट्ट्या आहेत. त्याचबरोबर लग्नसमारंभ, सहली, देवदर्शन आदी कारणांसाठी कुटुंबं घर बंद करून बाहेरगावी जातात. अशा बंद घरांवर चोरट्यांची नजर पडते. यावर प्रतिबंध घालण्यासाठी तळेगाव पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हॉट्सअॅप ग्रुपची संकल्पना राबवली आहे. येथील जुनी वस्ती, काकडदरा आणि रामदरा परिसरासाठी स्वतंत्र असे तीन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित भागानुसार बारकोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या घराच्या लोकेशननुसार योग्य ग्रुप जॉईन करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये दररोज रात्री गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांची नावं आणि मोबाईल क्रमांक टाकल्या जातो. जर कोणी कुटुंब बाहेरगावी जात असेल आणि घर बंद ठेवत असेल तर त्यांनी आपल्या घराचे लोकेशन व फोटो संबंधित क्रमांकावर पाठवायचे आहेत. त्यानंतर पोलिसांची रात्रगस्त पथक त्या ठिकाणी भेट देऊन घराची पाहणी करते आणि सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री करून संबंधित घरमालकाला त्याच ठिकाणाचे फोटो त्यांच्या मोबाईलवर पाठवते. त्यामुळे नागरिकांना दूर असतानाही आपल्या घराच्या सुरक्षेबाबत समाधान मिळते. ठाणेदार मंगेश भोयर यांच्या या उपक्रमामुळे तळेगावात सुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. सर्व ग्रामस्थांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ठाणेदार भोयर यांनी केले आहे.