राजकारणाला आता ‘क्लासरूम’चा स्पर्श!

कर्नाटकात नेता बनण्यासाठी खास महाविद्यालय

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
बंगळूर,
Politics taught at university कर्नाटक राज्यात तरुणांना सक्षम राजकीय नेतृत्वासाठी घडवण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होराट्टी यांनी एका कार्यक्रमात घोषणा करत सांगितले की, नव्या पिढीतील इच्छुकांना राजकारणाचे सखोल ज्ञान देण्यासाठी लवकरच विशेष महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.आज अनेक लोकप्रतिनिधींना सभागृहातील नियम, कायदे आणि कार्यपद्धतीची पुरेशी माहिती नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी सांगितले की, चर्चेत सहभागी होताना ही कमतरता स्पष्टपणे जाणवते. कोणतीही पूर्वतयारी न करता राजकारणात प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शन आणि शैक्षणिक प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
 

university karnataka 
 
काय शिकविण्यात येणार?
या नव्या महाविद्यालयामध्ये संविधानाची मूलभूत तत्त्वे, कायदे तयार करण्याची प्रक्रिया, संसदीय कामकाजाची पद्धत तसेच समाजसुधारकांचे विचार यांचा सखोल अभ्यास घडवला जाईल. विद्यार्थ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडावी, धोरणांची आखणी कशी करावी आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे कसे मांडावेत याचे प्रशिक्षण दिले जाईल. यासोबतच नैतिकता आणि आचारसंहितेवरही विशेष भर राहणार आहे.
प्रशिक्षित आणि माहितीपूर्ण नेतृत्व तयार झाल्यास प्रशासन अधिक जबाबदार आणि परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक धोरणांमध्ये सुधारणा होऊन शासनव्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. तज्ञांच्या मते, अशा शिक्षणामुळे तरुण नेत्यांमध्ये उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण होईल आणि भ्रष्टाचारावरही आळा बसू शकतो. मात्र, या शैक्षणिक उपक्रमासोबत प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्यासच खरा बदल घडू शकतो, असे मतही व्यक्त केले जात आहे.