यंदा दहावी-बारावी निकालाला उशीर?

कर्मचारी आंदोलनाचा थेट परिणाम!

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
मुंबई,
results of 10th and 12th class दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उत्तराखंड शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असला, तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा निकाल जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्याने निकाल प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पदोन्नती आणि बदलीसंबंधीच्या नियमांमध्ये बदल करत सेवा कालावधी दोन वर्षांवरून चार ते सहा वर्षांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच, हा निर्णय कर्मचारी संघटनांना विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. २८ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू झाल्यास निकालाच्या कामात अडथळे येऊ शकतात.
 
 
 

results  
 
दरम्यान, खाजगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या या परीक्षांसाठी आता नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना आपला सध्याचा पत्ता, जिल्हा, माध्यम आणि शाखेनुसार उपलब्ध शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय यांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. नोंदणी शुल्क देखील ऑनलाइन भरावे लागणार असून त्याची पावती विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यात उपलब्ध होणार आहे. यासाठी शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. एकूणच, निकालाबाबतची अनिश्चितता आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.