मुंबई,
Rihanna आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिने शुक्रवारी मुंबईतील फिनिक्स पॅलेडियम येथे आयोजित भव्य कार्यक्रमात तिच्या कॉस्मेटिक ब्रँड ‘फेंटी ब्युटी’च्या भारतातील अधिकृत लाँचला उपस्थिती लावली. ‘फेंटी ब्युटीची हवेली’ असे नाव देण्यात आलेल्या या विशेष पॉप-अप इव्हेंटमध्ये ग्लॅमर, फॅशन आणि सेलिब्रिटींची झलक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली.
या कार्यक्रमाला रिलायन्स रिटेलच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हलक्या निळ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये त्यांनी कार्यक्रमात आकर्षक उपस्थिती नोंदवली. ईशा अंबानी आणि रिहाना यांच्यातील संवाद तसेच त्यांचे एकत्रित फोटो हे कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले. बॉलिवूडमधील अनेक मान्यवरांनीही या लाँच इव्हेंटला हजेरी लावली. त्यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर, अदिती भाटिया, पश्मीना रोशन तसेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी यांचा समावेश होता.
रिहाना या कार्यक्रमात Rihanna ऑलिव्ह हिरव्या रंगाच्या ओव्हरसाईज शर्ट आणि लेदर स्कर्टमध्ये दिसून आली. तिच्या अनौपचारिक पण स्टायलिश लूकने उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमादरम्यान तिने चाहत्यांशी संवाद साधताना हलकाफुलका क्षणही निर्माण केला. स्टोअरमधून बाहेर येताना पापाराझींना उद्देशून तिने “How do you say thank you in Hindi?” असा प्रश्न विचारला. यावर तिला “शुक्रिया” असे सांगितले असता तिने हसतमुखाने तेच शब्द मोठ्याने उच्चारत उपस्थितांची दाद मिळवली.