सेलू आठवडी बाजारात पठाणी वसुली

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
ठेका रद्द करण्याची मागणी
 
सेलू, 
Selu market  सेलू शहरात नगरपंचायतीच्या वतीने दर मंगळवारी भरणार्‍या आठवडी बाजारात कर वसुलीच्या नावाखाली सुरू असलेल्या मनमानी वसुलीने दुकानदारांचा संताप उसळला आहे. अधिकृत ठेकेदार एक असताना प्रत्यक्ष वसुली मात्र दुसर्‍याकडून केली जात असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. प्रति दुकानदार २०० ते ५०० रुपयांपर्यंत जबरदस्तीने रक्कम उकळली जात असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. या प्रकाराला कंटाळून आठवडी बाजारातील व्यापार्‍यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्याकडे धाव घेत निवेदन सादर केले. यात संबंधित ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करून अधिकृत व्यतीकडूनच वसुली करण्यात यावी, बेकायदेशीर वसुली करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
selu
 
Selu market  निवेदनानुसार, वसुलीसाठी येणारे काही जण दुकानदारांशी उर्मट वर्तन करत अश्लिल भाषेचा वापर करतात. विशेष म्हणजे २१ एप्रिल रोजी काही दुकानदारांच्या अंगावर धावून त्यांना धमकावल्याने व्यापार्‍यांनी नाराजी व्यत केली. आठवडी बाजारात कर वसुलीसाठी कोणतेही ठोस निकष नसल्याने मनमानी सुरू आहे. पावती न देता वसुली केली जात असून नगरपंचायतीने स्पष्ट दरनिश्चिती करावी व अधिकृत पावती देणे बंधनकारक करावे, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी अविनाश डुकरे, अमोल मानकर, राहुल ठाकरे, आकाश फाटे, बबन मंगरूळकर, निलेश गावंडे, गौरव भट, कृणाल गोल्हर, प्रशांत आदमने, तुषार मांढरे, गितेश तिमांडे, विलास मानकर, राहुल पचारे, नंदू मांढरे, रुपेश मांढरे, विशाल मांढरे, शाहरुख शेख यांच्यासह अनेक दुकानदार उपस्थित होते.