मुंबई
King teaser बॉलिवूडमध्ये सध्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा रंगताना दिसत आहे. एका बाजूला ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असताना, आता सुपरस्टार शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला असून, त्यावर प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रदर्शित टीझरमध्ये शाहरुख खानचा दमदार अॅक्शन अवतार पाहायला मिळतो. टीझरच्या सुरुवातीलाच त्याला ‘किंग’ म्हणून संबोधलं जातं. एका दृश्यात तो हातात ‘किंग’ कार्ड धरताना दिसतो, तर पुढच्याच क्षणी काच फोडत त्याची प्रभावी एंट्री दाखवण्यात आली आहे. या दृश्यांसोबत त्याचा ठसकेबाज संवादही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे हा चित्रपट अॅक्शनप्रधान असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘किंग’ हा चित्रपट येत्या २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, वर्षअखेरीस तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानचा शेवटचा चित्रपट ‘डंकी’ २०२३ साली प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी ‘जवान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत मोठं यश मिळवलं होतं.
‘किंग’च्या टीझरला King teaser सोशल मीडियावर मिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही चाहत्यांनी टीझरचं कौतुक करत चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे, तर काहींनी त्यावर टीका करत तो ‘धुरंधर’च्या शैलीसारखा वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत उत्सुकतेसोबतच चर्चा आणि वादही रंगताना दिसत आहेत.या चित्रपटाची स्टारकास्टही तितकीच भक्कम आहे. शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.अॅक्शन, स्टारकास्ट आणि शाहरुख खानचा करिष्मा यामुळे ‘किंग’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला असून, बॉक्स ऑफिसवर तो कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.