महासत्तांमध्ये सायलेंट वॉरची चाहूल!

शास्त्रज्ञांच्या मृत्यूंनी जगात खळबळ

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
बीजिंग,
Suspicious deaths of Chinese scientists जगातील दोन महासत्तांमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या गुप्त स्पर्धेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर मिळाला असून चीनमधील काही महत्त्वाच्या शास्त्रज्ञांच्या संशयास्पद मृत्यूंमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. संरक्षण, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि संशोधन क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांच्या मृत्यूंच्या मालिकेमुळे हा केवळ योगायोग आहे की यामागे काही मोठे कारण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील काही वर्षांत चीनच्या संरक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या शास्त्रज्ञांचा विविध परिस्थितींमध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये काहींचा मृत्यू अपघातात झाल्याचे सांगितले जात असले तरी काही प्रकरणांमध्ये कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. विशेषतः लष्करी संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संरक्षण आणि हायपरसोनिक शस्त्रास्त्रांशी संबंधित क्षेत्रांतील तज्ज्ञ या घटनांमध्ये सहभागी असल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
इर ५ ६ ५ ६ ७
 
शास्त्रज्ञांच्या मृत्यूंच्या चौकशी सुरू
अहवालांनुसार, काही शास्त्रज्ञांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे, तर काहींचा अचानक आजारपणामुळे किंवा अस्पष्ट परिस्थितीत मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनांबाबत चीनकडून अधिकृत माहिती अत्यंत मर्यादित स्वरूपात दिली जात असल्याने संशय अधिकच वाढत आहे. त्यामुळे परकीय गुप्तचर यंत्रणांचा सहभाग असू शकतो का, असा प्रश्नही चर्चेत आहे.गेल्या काही काळात अमेरिकेतही अशाच प्रकारच्या काही शास्त्रज्ञांच्या मृत्यूंच्या चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील स्पर्धा केवळ उघड पातळीवर नसून पडद्यामागेही तीव्र स्वरूपात सुरू असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात होत आहे.
 
 
तज्ज्ञांच्या मते, या शास्त्रज्ञांचे कार्य अत्यंत संवेदनशील आणि धोरणात्मक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये होते. यामध्ये लष्करी तंत्रज्ञान, ड्रोन प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन आणि प्रगत शस्त्रास्त्र विकास यांचा समावेश होता. त्यामुळे या घटनांना केवळ अपघात मानायचे की यामागे काही मोठा कट आहे, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. दरम्यान, काही विश्लेषकांनी या घटनांमध्ये निश्चित स्वरूपाचा पॅटर्न दिसत नसल्याचे सांगत काही मृत्यू हे नैसर्गिक किंवा अपघातीही असू शकतात, असे मत व्यक्त केले आहे. मात्र अशा घटनांची वाढती संख्या आणि संवेदनशील क्षेत्रांशी त्यांचा संबंध यामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.